लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्यात इंटिग्रेटेड मेडिकल हब सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने अलीकडेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. त्यात ५० टक्के जागा होमिओपॅथीसाठी आहेत. राज्यात या चिकित्साप्रणालीच्या जागा वाढाव्या यासाठी लवकरच मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी केले. महाराष्ट्र राज्य होमिओपॅथी डॉक्टर्स कृती समिती आणि फेडरेशनच्या वतीने ब्रह्मा रिसोर्ट येथे आयोजित कार्यशाळेचा समारोप रविवारी (दि.१४) विष्णू सावरा यांच्या उपस्थितीत करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. डॉ. हेमंत सरवारे, डॉ. स्वप्नील महाजन, डॉ. नीलेश जाधव, डॉ. प्रकाश राणे आदि संघटनेचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. होमिओपॅथीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांची चांगली सेवा होत असून, अधिकाधिक चांगले प्रशिक्षण डॉक्टरांना मिळायला हवे, ही शासनाची भूमिका असल्याचे सांगून सावरा म्हणाले की, होमिओपॅथीचा नागरिकांना अधिकाधिक लाभ कसा होईल, याचा शासन विचार करीत आहे. या पॅथीच्या जागा वाढव्या यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईलच, शिवाय संघटनेच्या केंद्र शासनाशी संबंधित मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून शिफारस करण्यात येईल, असेही ते म्हणाले. यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केले.
होमिओपॅथीच्या जागा वाढण्याची शक्यता
By admin | Published: May 15, 2017 1:29 AM