नाशिाक : नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबरोबरच आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यावर भर दिला जात असून त्यासाठी शासनाच्या आपत्ती प्रतिसाद निधीमधून जिल्ह्यासाठी निधीची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना या माध्यमातून निधीदेखील प्राप्त झालेला आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी चिंता वाढविणारी असून, वाढत्या संख्येबरोबरच इतक्या मोठ्या संख्येने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना उपचार देण्याबाबतची उपायोजना करावी लागत आहे. यासाठी सरकारी आरोग्य यंत्रणेबरोबरच खासगी रुग्णालयांचीदेखील मदत घेतली जात असून, काही बेड्स राखून ठेवण्यात येत आहेत. मात्र रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवरदेखील ताण निर्माण होत आहे.
मागील वर्षी कोरोनाच्या काळात अनेक सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती आणि लोकप्रतिनिधींच्या निधीचा वापर करून कोरोना उपायोजनेसाठी थोड्याफार प्रमाणात मदत होऊ शकली. आता सर्वकाही स्थानिक स्वराज्य संस्था आणि आरोग्य यंत्रणेकडे असलेल्या तरतुदींवरच भर द्यावा लागत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शासनाकडे निधीची मागणी केली जाणार असून, त्या आनुषंगाने तत्काळ नियोजनदेखील केले जात आहे.
राज्य पातळीवर असलेल्या समितीकडे यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचेही समजते. अर्थात याबाबतची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मात्र एकूणच कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता नाशिक विभागाकडून निधीची मागणी केली जाणार असल्याची दाट शक्यता आहे. मागीलवर्षी लोकप्रतिनिधींना आपल्या निधीतील ५० लाख रुपये खर्च करून आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यास हातभार लावला होता. शासनाच्या विविध योजनांचे काम थांबविण्यात येऊन कोरोनाच्या कामाला मदत करण्याच्यादेखील सूचना होत्या. आता मात्र मार्चअखेर असल्याने मागील नियोजनाचा खर्च करावा लागणार असल्याने शासनाकडूनच कोविडसाठी काही प्रमाणात निधी मिळविण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.