नांदूरवैद्य : पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरीसह त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे आलेली भातशेती संकटात सापडली आहे. सध्या भाताच्या रोपांची वाढ खुंटली आहे. भातासह इतर रोपांना याकाळात पाण्याची अत्यंत आवश्यकता असते मात्र पाऊसच गायब झाल्यामुळे बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. त्यामुळे जोरदार पाऊस होण्याची प्रतीक्षा लागली आहे. पावसाअभावी तालुक्यात काही भागांत भाताची रोपे करपू लागली आहेत. याचा परिणाम पुढील काळात होणाऱ्या उत्पादन क्षमतेवर घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला सरासरी ९७ टक्के पर्जन्यमान होईल,असा अंदाज वर्तवला होता. यामुळे बळीराजा सुखावला होता. त्यानुसार जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. मात्र त्यानंतर जिल्ह्यातील चार ते पाच तालुके वगळता इतर तालुक्यांमध्ये अद्यापही दमदार पाऊस पडलेला नाही. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
-------------------
जिल्हा अजूनही कोरडाच
पावसाळा सुरू झाल्यापासून अधूनमधून आलेल्या रिमझिम पावसावर खरिपाची पिके हिरवी दिसत असली तरी त्यांचा उत्पादन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. जिल्ह्यातील येवला, देवळा, नांदगाव, मालेगाव, सटाणा, सिन्नर आदी तालुक्यांमध्ये सोयाबीन, मका बाजरीची पेरणी झाली असली तरी अपेक्षित असा पाऊस होत नसल्याने पिके करपण्याची शक्यता वाढली आहे. जिल्ह्यातील इगतपुरी, नाशिक, पेठ, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, सुरगाणा आदी तालुक्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस झाल्याने समाधान असले तरी पिकांची चिंता मात्र वाढली आहे.
------
इगतपुरी तालुक्यात अल्प पावसाअभावी पिवळे पडलेली भाताची रोपे. (२७ नांदूरवैद्य भात)
===Photopath===
260621\26nsk_8_26062021_13.jpg
===Caption===
२७ नांदूरवैद्य भात