नाशिक : आर्थिक दुर्बल व मागासप्रवर्गांतील गरजू विद्यार्थ्यांसाठी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात राखीव २५ टक्के जागांवर प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी शाळा नोंदणी प्रक्रियेविषयी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला अद्याप कोणतीच सूचना प्राप्त झालेली नाही. त्यामुळे यावर्षीही आरटीईची प्रवेशप्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे.शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत दरवर्षी डिसेंबर महिन्यात शाळा नोंदणीला सुरुवात होते. परंतु, गेल्या वर्षापासून ही प्रक्रिया उशिरा होत असल्याने यंदाही प्रवेशप्रक्रिया लांबल्याचे दिसून येत आहे. यावर्षीही डिसेंबरचा पूर्वार्ध उलटला असून, अद्यापही शाळा नोंदणीप्रक्रिया सुरू करण्याविषयी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला कोणतीही सूचना प्राप्त झालेली नाही. गेल्यावर्षी ही प्रक्रिया मार्च महिन्यापर्यंत लांबल्यामुळे प्रत्यक्ष आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया तब्बल सप्टेंबरपर्यंत सुरू होती. त्यामुळे पहिल्या टप्प्यात प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांनी ज्या शाळेत प्रवेश मिळेला तेथेच प्रवेश निश्चित करून घेतल्यामुळे आरटीई अंतर्गत जिल्ह्यातील ५ हजार ७३५ जागांसाठी तब्बल १४ हजार ५७३ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झालेले असताना त्यापैकी केवळ ४ हजार ४३४ प्रवेश होऊ शकले. यावर्षी पुन्हा शाळा नोंदणीची प्रकिया लांबल्यामुळे आॅनलाइन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया आणि त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया कधी सुरू होणार याविषयी आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान, शिक्षण विभागातील विविध प्रक्रियांमधील डाटा अपलोडिंगचे काम सुरू असल्याने शाळा नोंदणी प्रक्रिया लांबली असून, डिसेंबरअखेरपर्यंत शाळा नोंदणीसंदर्भात शिक्षण विभागाकडून आदेश प्राप्त होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
आरटीई प्रवेशप्रक्रिया लांबण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 1:21 AM
आर्थिक दुर्बल व मागासप्रवर्गांतील गरजू विद्यार्थ्यांसाठी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात राखीव २५ टक्के जागांवर प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी शाळा नोंदणी प्रक्रियेविषयी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला अद्याप कोणतीच सूचना प्राप्त झालेली नाही. त्यामुळे यावर्षीही आरटीईची प्रवेशप्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्दे२५ टक्के राखीव जागा शाळा नोंदणीसाठी अद्याप सूचनाच नाही