नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात दि. २९ आॅगस्ट ते १८ सप्टेंबर या पर्वणीकाळात कोट्यवधी भाविक दाखल होणार असल्याने महापालिकेने गोदाघाट परिसरासह वाहनतळ आणि भाविक मार्गांवर ठिकठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात शौचालये व मुताऱ्या उभारण्याचे प्रस्तावित केले आहे; मात्र पर्वणीकाळातील २३ दिवसांपैकी फक्त नऊ दिवसांसाठीच सदर शौचालये व मुताऱ्यांमध्ये पाणीपुरवठा आणि स्वच्छताविषयक सुविधा पुरविण्याचे नियोजन करत तसा ठेका देण्याचा प्रस्ताव तयार केल्याने उर्वरित १४ दिवसांच्या कालावधीत स्वच्छताविषयक गंभीर संकट उभे राहून शहरात अनारोग्य माजण्याची शक्यता आहे. अशाप्रकारचे अजब नियोजन करत महापालिका एकप्रकारे नाशिककरांच्या आरोग्याशीच खेळ खेळणार असल्याचे दिसून येत आहे. सिंहस्थ कुंभमेळा पर्वणीकाळात महापालिकेसमोर स्वच्छताविषयक मोठे आव्हान आहे. पर्वणीकाळात रोगराई पसरू नये आणि भाविकांबरोबरच नाशिककरांच्याही आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, याची दक्षता महापालिकेसह जिल्हा प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. सिंहस्थ पर्वणीकाळात शहरात कोट्यवधी भाविक-यात्रेकरू दाखल होणार असल्याने महापालिकेने त्यांच्या नैसर्गिक विधीसाठी ठिकठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात शौचालये आणि मुताऱ्या उभारण्याचा प्रस्ताव तयार करत त्यासंबंधी निविदाप्रक्रियेला मंजुरी देण्यासंबंधीचा विषय शुक्रवारी (दि.२२) स्थायी समितीच्या होणाऱ्या बैठकीत ठेवला आहे.
शहरात अनारोग्य माजण्याची शक्यता
By admin | Published: May 22, 2015 1:53 AM