राष्ट्रवादी जलचिंतन सेलचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी यासंदर्भातील प्रस्ताव पालकमंत्री छगन भुजबळ यांना पाठविला होता. त्यानंतर त्यांनी तो पर्यटन विभागाकडे सादर केला. त्याची दखल घेऊन आदित्य ठाकरे यांनी आता पर्यटन विभागाला अभिप्रायासह प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सायकलप्रेमींच्या देखील आशा पल्लवित झाल्या आहेत. गंगापूर धरणासाठी भूसंपादन करताना उच्चतम पूर पातळीचा विचार करून शासनाने धरणाच्यालगत अतिरिक्त जागा संपादित केली हेाती. त्यात बॅकवॉटरलगत, नागलवाडी, पिंपळगाव गरूडेश्वर, गिरणारे, ओझरखेड, गणेशगाव, गंगाव्हरे, सावरगाव अशाप्रकारची गावे येतात. धरणापासून या गावापर्यंतची शंभर मीटर जागा जलसंपदा विभागाच्या ताब्यात आहे. त्यामुळे या ठिकाणी नऊ मीटर रुंदीचा सायकल ट्रॅक सहज विकसीत होऊ शकतो. इंग्लंड, फ्रान्स, इटली, स्वीत्झरलँड अशा ठिकाणी सायकल ट्रॅक असून त्याच धर्तीवर हा सायकल ट्रॅक विकसित करण्याची सूचना जाधव यांनी मांडली. ती मान्य करून आता अशाच प्रकारे ट्रॅक साकारण्यासाठी पडताळणी सुरू केली आहे.
इन्फो..
वैतरणा येथील प्रस्तावालाही मिळावी गती
दोन वर्षांपूर्वी वैतरणा डॅमजवळ अशाच प्रकारे सायकल ट्रॅक तयार करण्यासाठी तत्कालीन पर्यटन विभागाचे प्रादेशिक अधिकारी नितीन मुंडावरे यांनी प्रस्ताव पाठविला होता. त्यालाही आता उजाळा मिळाला असून त्याला देखी गती द्यावी, अशी मागणी सायकलप्रेमींकडून होत आहे.