कोरोनाच्या काळात प्रवासी साधने, तसेच बँकाही बंद असल्यामुळे आदिवासी, दुर्गम भागातील नागरिकांना टपाल खात्याने बँकेची घरपोच सुविधा उपलब्ध करून दिली. सुमारे १६ कोटी रुपयांचे वाटप पोस्टमनच्या माध्यमातून करण्यात आले. सुमारे ६० हजार ग्राकहांपर्यंत पोहोचून टपाल खात्याने बँकिंग, तसेच पोस्टाच्या सुविधा ग्राहकांना पुरविल्या. ३५० पोस्टमन कोरोना काळात या उपक्रमासाठी राबले.
घरपोच जीवनप्रमाणपत्र
कोरोनामुळे बँकांना जिवीताचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँकेत पोहोचू न शकलेल्या ज्येष्ठ नागरिकांना टपाल खात्याने घरी जाऊन जीविताचे प्रमाणपत्र बहाल केले. अनेक ज्येष्ठ घराबाहेर पडू शकत नसल्याने त्यांना टपालखात्याने दिलासा दिला. सुमारे दीड हजार ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या जीवितीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया राबविण्यात आली.
टपालाने पाठविले ७६ हजार पार्सल
अत्यावश्यक सेवा असलेल्या टपाल खात्याने एप्रिल महिन्यापासून कामकाजाला सुरुवात केली. या काळात सर्वच कुरिअर सेवा बंद असल्याने टपाल खात्याने एप्रिल ते जून या कालावधीत ७६, ८८७ इतक्या पार्सलची वाहतूक केली. दळणवळणाची साधने बंद असताना, टपालाच्या मेल सेवेने दुसऱ्या शहरांमध्ये जाऊन साहित्य ग्राहकापर्यंत पोहोचविले.