नाशिक : टपाल खात्याला विविध योजनांच्या माध्यमातून सातत्याने ‘ऊर्जा’ देण्याचा प्रयत्न नेहमीच होत असतो. तसाच प्रयत्न पुन्हा एकदा शासनाने करत थेट गंगोत्री अन् ऋषिकेशचे गंगाजलच विक्रीसाठी आता पोस्टामध्ये उपलब्ध करून दिले आहे.‘फिलैटेली’च्या माध्यमातून दुर्मिळ तिकीटविक्री, माय स्टॅम्पद्वारे तिकिटावर छबी, सुकन्या समृध्दी योजना, पेन्शन, विमा योजनांपासून तर बॅँकिंगचे सर्व व्यवहार पोस्टात होत आहे. एकूणच केवळ पत्रव्यवहारापुरते टपाल खाते या आधुनिकतेच्या काळात मर्यादित राहिले नसून तर स्पर्धेच्या या युगात पोस्टाने झपाट्याने कात टाकली आहे. यामुळे पोस्टाची आगळीवेगळी ओळख निर्माण झाली आहे. केंद्र सरकारची सर्वात जुनी संस्था विश्वसनीय संस्था म्हणून भारतीय टपालाकडे नागरिक बघतात. संदेशवहनाची विविध माध्यमे या आधुनिक काळात विकसित झाल्याने टपालाचे महत्त्व कमी होईल, असे वाटत होते; मात्र टपालाचे अस्तित्व टिकविण्यासाठी सातत्याने नानाविध संकल्पनांच्या माध्यमातून प्रयोग शासनाकडून केले जात आहेत. हिंदू धर्मात पवित्र जल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऋषिकेश, गंगोत्री या ठिकाणांवरील गंगाजल नागरिकांसाठी पोस्टाने उपलब्ध करून दिले आहे. पंधरवड्यापासून शहरातील मुख्य टपाल कार्यालयातून या दोन्ही ठिकाणांच्या गंगाजलच्या बाटल्यांची विक्री केली जात आहे. पोस्टात ऋषिकेश व गंगोत्रीचे गंगाजल २५० मिली व ५०० मिलीच्या बाटलीमध्ये उपलब्ध आहे. पोस्टातून होत असलेल्या गंगाजलच्या विक्रीने नागरिकही अवाक् झाले आहे. मुख्य डाकघरच्या कार्यालयाच्या आवारात गंगाजल विक्रीचे दरपत्रक लावण्यात आले आहेत. पोस्टात दैनंदिन व्यवहारांसाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये ‘गंगाजल विक्री’ हा कुतुहलाचा विषय ठरत आहे. (प्रतिनिधी)
गंगा आली पोस्टाच्या दारी
By admin | Published: August 29, 2016 1:29 AM