नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक ६ किंवा ७ जूनला होण्याची दाट शक्यता असून, त्या अनुषंगाने उद्या (दि.२७) विशेष बैठकीची अधिसूचना निघणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, अध्यक्षपदासाठी आवश्यक असलेले ११ संचालकांचे संख्याबळ हिरे आणि कोकाटे-पिंगळे गटाकडे कालपर्यंत (दि.२६) जमले नसल्याचे चित्र होते. तसेच हिरे गटाच्या दोन्ही हिरे बंधू संचालकांना तसेच कोकाटे- पिंगळे गटाच्या माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षपदाच्या नावाला चार ते पाच संचालकांनी आक्षेप घेतल्याचे कळते. तसेच पाच संचालकांचा दबाव गट तयार होण्याची चिन्हे आहेत. काल जिल्हा परिषदेत सभापती केदा अहेर यांच्या कक्षात पाच ते सहा संचालकांनी हजेरी लावत अध्यक्ष पदासाठी चर्चा केली. मंगळवारी याबाबतची अधिसूचना निघण्याची शक्यता होती. मात्र, आता ही अधिसूचना बुधवारी (दि.२७) निघणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाची संख्या २१ असून, अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयासाठी ११ संचालकांची मॅजिक फिगर गाठणे आवश्यक आहे. हिरे गटाने त्यांच्याकडे १३ ते १४ संचालक असल्याचा दावा केला असला तरी या संचालकांची नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत. त्यामुळे हिरे गटाकडे नेमके किती संचालकांचे ‘पाठबळ’ आहे, याची माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यातच कोकाटे-पिंगळे गटाकडून संचालकांची जमवाजमव सुरूच असल्याचे चित्र होते. अपक्ष म्हणून निवडून आलेले जिल्हा परिषद सभापती केदा अहेर, सदस्य अॅड. संदीप गुळवे यांच्यासह नामदेव हलकंदर, सचिन सावंत व धनंजय पवार यांचा एक दबाव गट तयार होेण्याची शक्यता आहे, तर शिवसेनेचे आमदार अनिल कदम व सुहास कांदे या संचालक जोडीने अद्यापही ‘वेट अॅन्ड वॉच’ची भूमिका घेतल्याने अध्यक्ष पदाची चुरस वाढली आहे. सभापती केदा अहेर यांच्या कक्षात मंगळवारी जिल्हा परिषद सदस्य व संचालक अॅड. संदीप गुळवे यांच्यासह धनंजय पवार, परवेज कोकणी, सुहास कांदे यांनी हजेरी लावली. तसेच अध्यक्ष पदाबाबत चर्चा केली. मात्र, कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. पाच संचालकांनी तयार केलेल्या दबाव गटात सहभागी असलेल्या एका संचालकांना माणिकराव कोकाटे यांना विरोध आहे, तर दुसऱ्या संचालकाचा हिरे बंधूंना अध्यक्षपदासाठी विरोध आहे. त्यामुळे दोन्ही गटांना आता अध्यक्षपदाचे उमेदवार बदलून चर्चा सुरू करावी लागण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)
्रअध्यक्ष पदासाठी हिरे-कोकाटेंना विरोध आज निघणार
By admin | Published: May 27, 2015 12:39 AM