सिन्नर : ‘आधार’ला मोबाइल लिंक करण्याची विशेष मोहीम भारतीय डाक विभागाच्या नाशिक विभागाने सुरू केली असल्याची माहिती प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी दिली.
नाशिक डाक विभागाने पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक यांच्या माध्यमातून विभागातील सर्व डाक कार्यालयांतून आधारला मोबाइल क्रमांक अद्ययावत करण्याची सुविधा सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांना घरपोच आधार-मोबाइल लिंक करण्यासाठी सुविधा नाशिक विभागात सुरू करण्यात आली आहे. सोमवार (दि. २३) पासून २८ ऑगस्टपर्यंत ही मोहीम राबविण्यात येत आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ही लोकाभिमुख बॅँक असून प्रत्येक व्यक्तीपर्यंत शासनाचे लाभ पोस्टमनच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या काळात डाक विभागाने घरपोच अदा केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या सोयीमुळे नागरिकांना घरपोच त्यांच्या आधारला मोबाइल क्रमांक लिंक किंवा अपडेट करता येणार आहे. किंवा पूर्वीचा मोबाइल क्रमांक बदलून घ्यावयाचा असल्यास तो देखील बदलून घेता येईल.
चौकट...
आधारला मोबाइल क्रमांक लिंक असणे आवश्यक
आधारमध्ये स्वत:लाच बरेच बदल करून घेता येतात. शासनाच्या बऱ्याच योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील आधारला मोबाइल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती फॉर्म भरणे, प्रधानमंत्री किसान योजनेचे अनुदान, रिक्षाधारकांचे अनुदान किंवा भविष्यात येऊ घातलेल्या इतर योजना या माध्यमातून होऊ शकतात.
कोट...
आधारला मोबाइल लिंक असल्याने इतर कुणी आपल्या आधारच्या माहितीचा दुरुपयोग करू शकत नाही. कारण त्याची अद्ययावत माहिती लगेच आपल्या मोबाइलला येते. त्यामुळे आपली फसवणूक होत नाही. नाशिक विभागातील सर्व जनतेने जवळच्या पोस्ट कार्यालयात अथवा आपल्या पोस्टमनशी संपर्क साधावा व या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा.
- मोहन अहिरराव, प्रवर अधीक्षक, डाकघर नाशिक विभाग.