शहरातील मुख्य टपाल कार्यालयाच्या नियंत्रणाखाली असलेल्या १३ उप-डाक कार्यालयांच्या माध्यमातून नाशिककरांना घरोघरी पत्रे आणि पार्सलही पोहोचविले जाते. ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी अनेक उपक्रम राबविणाऱ्या टपाल विभागाने यंदा नाशिक शहरामधील नागरिकांना जलद पार्सल सेवा देण्यासाठी स्वतंत्र पार्सल हब सुरू केले आहे. त्यामुळे ग्राहकांना लवकरात लवकर टपाल मिळणार आहे.
विविध प्रकारची पत्रे, पाकिटे, मासिके घेऊन पोस्टमन ग्राहकांपर्यंत पोहोचतो. राज्यातील इतर शहरे तसेच परराज्य अनेकदा परदेशातूनही शहरातील नागरिकांना त्यांचे आप्तेष्ट पार्सलने वस्तू पाठवित असतात. गत वर्षापर्यंत अशा प्रकारचे पार्सल हे त्या-त्या उपडाक कार्यालयात पाठविले जात होते. तेथून टपाल बटवडा करणारे पोस्टमन पार्सल घेऊन ग्राहकांना सुपूर्द करीत होते. यामुळे त्याच्याकडील बोजाही वाढला होता आणि पार्सल पोहोचण्यास विलंबदेखील होत होता.
नवीन वर्षात मुख्य टपाल कार्यालयातच आता सर्व प्रकारचे पार्सल्स जमा होणार असून, तेथूनच ग्राहकांपर्यंत पोस्टमनच्या माध्यमातून ते पोहोचणार आहेत. यासाठी स्वतंत्र पोस्टमनची टिम तयार करण्यात आली आहे. ही टीम केवळ पार्सल पोहोचविण्याचे काम करणार आहे. त्यामुळे उपकार्यालयातील पोस्टमन केवळ टपाल बटवड्याचेच काम करणार आहेत. दोन्ही कामे करण्यासाठी स्वतंत्र जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे वाटपाचे काम हे जलद गतीने होणार आहे.
यापूर्वी मुख्य टपाल कार्यालयातून उपडाक कार्यालयात पार्सल पाठविले जात होते. तेथून ते डिस्ट्रीब्यूट होऊन ग्राहकांपर्यंत पोहोचविले जात होते. आता ही पद्धत बंद होणार आहे. नव्या वर्षात नवीन पद्धतीने अधिक सुरक्षित पार्सल ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे.