नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १४ मार्च रोजी होणारी स्पर्धा परीक्षा रद्द केल्यानंतर काही राजकीय लोकांच्या दबावाला बळी पडून २१ मार्च रोजी सदर परीक्षा घेण्याचे निश्चित केल्याचा आरोप करीत छावा क्रांतिवीर संघटनेने मराठा समाजातील उमेदवारांचा विचार करून मराठा आरक्षणाचा निकाल येईपर्यंत ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे वयाचा प्रश्न निर्माण होणाऱ्या उमेदवारांसाठी किमान दोन वर्ष वयोमर्यादा वाढवून देण्याच्या मागणीबाबत छावा क्रांतिवीर संघटनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनही देण्यात आले आहे.
सर्व प्रवर्गातील उमेदवारांना न्याय देत असताना मराठा समाजाच्या उमेदवारांना स्पर्धा परीक्षा व शासकीय नोकर भरतीपासून वंचित ठेवण्याचे काम करु नये अशी भूमिका छावा क्रांतिवीर संघटनेने घेत एमपीएससीसह सर्वच परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. दिनांक १५ मार्चपासून मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी न्यायालयात सुरू होत असून, २५ मार्चपर्यंत ती पूर्ण होणार आहे. त्यानंतर ७ ते ८ दिवसांमध्ये निकाल लागण्याची शक्यता आहे. म्हणजे दिनांक १ एप्रिलपर्यंत आरक्षणा संदर्भात निर्णय येण्याची शक्यता असल्याचे नमूद करतानाच राज्य सरकारने शासकीय नोकर भरती आणि स्पर्धा परीक्षा ५ एप्रिलनंतर घ्याव्यात अशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी केली आहे.