नाशिक : लष्करी जवानांना देवळाली मार्केटमध्ये जाण्यास मनाई केल्यानंतर जवानांचे साहसी शिबीरही गुंडाळण्यात आले आहे. या निर्णयामुळे लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्या जवानांवर चांगलाच अंकुश बसविला असल्याची चर्चा सुरू आहे. गेल्या १४ रोजी तोपखाना केंद्रातील १८ ते २० जवानांनी उपनगर पोलीस ठाण्यावर हल्ला करून पोलिसांना मारहाण केल्यानंतर लष्करी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांना दिले होते. संरक्षण मंत्रालयानेदेखील या प्रकरणाची दखल घेतल्याचे बोलले जात असतानाच तोपखाना केंद्रातील जवानांवर अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. चार दिवसांपूर्वीच लष्करी हद्दीतून नागरी वसाहतीकडे जाणाऱ्या मार्गांवर बॅरेकेटस् टाकून जवानांना रहिवासी क्षेत्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे, तर गुरुवारी देवळाली कॅम्प मार्केटमध्ये जाण्यासही मज्जाव करण्यात आल्याचे अधिकृत जाहीर करण्यात आल्याने जवानांची कोंडी झाली आहे. यासंदर्भात आणखी पत्रक काढून दारणा धरण क्षेत्रात होणारे शिकाऊ लष्करी अधिकाऱ्यांचे साहसी प्रशिक्षण शिबीरही स्थगित कण्यात आले आहे. असे असले तरी यावर लवकरच तोडगा निघेल असा विश्वासही लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
लष्कराकडून जवानांचे प्रशिक्षणही स्थगित
By admin | Published: January 23, 2015 11:11 PM