संदीप भालेराव, नाशिक : जिल्ह्यातील रिक्त असलेल्या पोलिस पाटील व कोतवाल पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची येत्या २२ रोजी होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. बिगर आदिवासी बचाव संस्था या भरती विरोधात न्यायालयाने केल्याने परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती अपर जिल्हा दंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिली. पोलिस पाटील पदाच्या ६६४ जागांसाठी एकूण ६ हजार ५०, तर कोतवाल या पदाच्या १४६ जागांसाठी २ हजार ४८० अर्ज प्राप्त झाले आहेत. येत्या २२ रोजी जिल्ह्यात १६ केंद्रांवर परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. पोलिस पाटील पदाच्या रिक्त जागा भरण्यासंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होती. त्यानुसार जिल्ह्यात पोलिस पाटील, तसेच कोतवाल पदासाठी भरती काढण्यात आली. मात्र, त्यासही आता खो बसला आहे.
या भरतीसाठीची परीक्षेची संपूर्ण तयारी झालेली असताना बिगर आदिवासी आरक्षण हक्क बचाव संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून सर्वोच्च न्यायालयाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पेसा क्षेत्रातील विहित करण्यात आलेल्या १७ संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने निवड प्रक्रिया/नियुक्तीसंदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये, असे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे निर्देश आहेत. पोलिस पाटील, कोतवाल हे पद देखील अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) १७ सवंर्गाच्या सूचीतील असल्यामुळे नाशिक जिल्ह्यात सद्य:स्थितीस चालू असलेली रिक्तपद भरती पुढील आदेशापावेतो स्थगित करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. दरम्यान, भरती पुढील आदेशापर्यंत स्थगित असल्याने या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी नोंद घ्यावी, असेही अपर जिल्हादंडाधिकारी वाघ यांनी कळविले आहे.