नाशिक - गेल्या दोन वर्षांत सुमारे साडेसहाशे कोटी रुपयांचे रस्ते तयार केल्यानंतर नवीन चकचकीत रस्त्यांच्या ऐवजी खड्डे पडल्याने नागरिक त्रस्त झाले असून रोजच अपघात घडत आहेत. महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून त्यावर मलमपट्टीची खोटी आकडेवारी देत असल्याचे सांगत माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी संबंधितांची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे, तर दुसरीकडे खासदार हेमंत गोडसे यांनीही आयुक्तांची याच विषयावर चर्चा केली आता आयुक्तांनी रस्त्यांची माहिती मागवली असून नित्कृष्ट रस्ते तयार करणाऱ्यांना थेट काळ्या यादीत टाकण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
नाशिक शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट असून महापालिकेकडून रोज पडलेले खड्डे आणि बुजवलेले खड्डे याबाबत नवीन माहिती दिली जात आहे. महापालिकेकडून सुमारे सहा हजार खड्डे बुजवल्याचा दावा केला गेला असला तरी रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत की, महापालिकेकडून खरोखरच इतक्या मोठ्या प्रमाणात रस्ते बुजवले गेले किंवा नाही याविषयी शंका घेतली जात आहे. यासंदर्भात महपाालिकेतील शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी शुक्रवारी (दि.१९) चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेऊन निवेदन दिल. आठ ते दहा वर्षांपूर्वाचे रस्ते सेाडाच; परंतु तीन महिन्यांपूर्वी नवीन तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अत्यंत दर्जाहीन रस्ते तयार झाले आहेत आणि या रस्त्यांच्या डागडुजीवर पुन्हा २७ कोटी रुपये खर्च करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे या कामांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे, तर दुसरीकडे खासदार हेमंत गोडसे यांनी देखील महापालिका आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांना निवेदन दिले आहे. लवकरच गणेशोत्सव सुरू होत असून त्यामुळे उत्सव सुरू होण्याच्या आत खड्डे बुजवावे, अशी मागणी गोडसे यांनी केली आहे.
आयुक्तांनी मागितली रस्त्यांची माहिती
नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी रस्त्याची माहिती घेतली असता त्यांना बांधकाम विभागाकडून वेगवेगळी कारणे सांगितली जात असून त्यामुळे त्यांनी कोणता रस्ता कधी तयार केले, त्याचे बिल कधी दिले गेले या सर्वांची माहिती मागवल्याचे समजते. आयुक्त पुलकुंडवार यासंदर्भात कठोर भूमिका घेत असून नित्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची तयारी सुरू असल्याचे समजते.