नांदुरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या दोडी बुद्रुक येथील ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होऊन परिवर्तन पॅनलने १३ पैकी ११ जागा जिंकत सत्ता हस्तगत केली, तर नम्रता पॅनलला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले.१३ जागांसाठी ३१ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते.
ज्येष्ठ नेते पांडुरंग केदार, राजाराम आव्हाड व जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनल तर पंचायत समिती माजी सभापती बाळासाहेब वाघ व माजी सरपंच पी.जी. आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली नम्रता पॅनलमध्ये समोरासमोर लढत झाली. पाचही प्रभागांत अटीतटीच्या लढती झाल्या.
प्रभाग एकमधून सर्वसाधारण जागेवर दत्तू मुरलीधर दराडे (३८७) यांनी नामदेव कचरू आव्हाड यांचा पराभव केला, तर अनुसूचित जमाती महिला राखीव जागेवर कमल मनोहर माळी (३५९) यांनी सुमनबाई आगिवले यांचा पराभव केला. सर्वसाधारण महिला जागेतून सविता शंकर आव्हाड (३७६) यांनी शितल सोनवणे यांनी धूळ चारली. प्रभाग दोनमध्ये साहेबराव रभाजी शिंदे (३७४) व जयश्री कैलास जाधव (४६८) हे विजयी झाले, तर गोविंद शिंदे व मीनाबाई शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला.माजी सरपंच पराभूतप्रभाग चारमधून ज्ञानेश्वर शंकर आव्हाड (६०४), बाळू हरी सांगळे (५५२), ज्योती नितीन भालेराव (६०२) हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, तर माजी सरपंच पी.जी. आव्हाड, त्र्यंबक आव्हाड, वर्षा भालेराव यांना पराभूत केले. प्रभाग पाचमधून सर्वसाधारण जागेवर जगन्नाथ राणू केदार (३६१) यांनी अशोक सावळीराम केदार यांचा पराभव केला.
ओबीसी गटातून वैशाली चंद्रकांत केदार (३६३), राजश्री ज्ञानेश्वर शेळके (३८२) हे विजयी झाले. त्यांनी सारिका गणपत केदार व सिंधू सुरेश कांगणे यांचा पराभव केला. वार्ड क्रमांक तीनमधून नम्रता पॅनलचे सुखदेव बाबुराव आव्हाड (३६३) यांनी नामदेव सन्तु आव्हाड (३४८) यांचा पराभव केला. अंकिता गणेश वाघ (३९२) यांनी मंदाबाई एकनाथ आव्हाड (३३८) यांचा पराभव केला.