नाशिक : आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विंचूर फाटा सैय्यद पिंप्री रोडवरील 132 के. व्ही. आडगाव उपकेंद्रातून उघड्या जागेवर ठेवलेले हजारो रुपये किंमतीचे विजेचे उपकरणे व साहित्य भुरट्या चोरांनी लांबवून विज वितरण कंपनीला 'शॉक' दिला आहे. याबाबत द्वारका काठे गल्ली येथे राहणाऱ्या गणेश खोलमकर यांनी आडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.गेल्या मंगळवारी सकाळी चोरी झाल्याचे निदर्शनास आले. 132 के.व्ही. उपकेंद्र आवारात काही दिवसांपूर्वी विज वितरण कंपनी कर्मचाऱ्यांनी 150 किलो वजनाच्या जुन्या कॉपर वायडींग वायर, 600 लिटर इन्सुलेटिंग ऑइल ठेवलेले होते.अज्ञात चोरट्यांनी आडगाव उपकेंद्र आवारात प्रवेश करून उपकेंद्रातून सदर 72 हजार रुपये किमतीच्या वस्तू चोरून नेल्या आहे सदर प्रकार विज वितरण कंपनी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी वरिष्ठांना माहिती कळविली त्यानंतर आडगाव पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.यापूर्वी देखिल नाशिक शहरात अनेकदा भुरट्या चोरट्यांनी विज वितरण कंपनी वस्तू चोरून नेण्याचे धाडस केले आहे. आता तर भुरट्या चोरट्यांनी थेट उपकेंद्र कार्यालय गाठत त्या ठिकाणाहून वायर्स, ऑइल चोरी करून एकप्रकारे विज वितरण कंपनीलाच आर्थिक शॉक दिल्याचे बोलले जात आहे.