लोकमत न्यूज नेटवर्क
एकलहरे : सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना, एकीकडे कोरोनाशी लढा देत दुसरीकडे वीज निर्मितीत व्यस्त असलेल्या नाशिक औष्णिक वीज केंद्रातील कामगार व अभियंत्यांना कोरोनापेक्षा महाभयंकर अशा बदल्यांच्या साथीचा सामना करावा लागत आहे. यामुळे वीज निर्मितीशी लढावे की, कोरोनाचा मुकाबला करावा, अशा द्विधा मनःस्थितीत प्रशासन सापडले आहे.
नाशिक औष्णिक वीज केंद्रात अभियंते व कामगारांचा तुटवडा भासत असताना वारंवार प्रतिनियुक्तीवर बदल्यांचे आदेश मुख्यालयातून निघत आहेत, त्यामुळे कामगार व अभियंत्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या बदल्यांमुळे येथील वीज केंद्र चालवणे स्थानिक प्रशासनाला डोकेदुखी ठरत आहे. मात्र, वारंवार प्रतिनियुक्तीवर बदल्यांचे आदेश काढण्याचा तुघलकी निर्णय मुख्यालयातील काही अधिकारी घेत असल्याने नाशिक वीज केंद्राविषयी त्यांच्या मनात आकस असल्याचे स्पष्ट होत आहे, अशी प्रतिक्रिया युनियनच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.
नाशिक औष्णिक वीज केंद्रात सुमारे चारशे अभियंते व कामगारांचा तुटवडा भासत असतानाही आधीच ४८ अभियंते प्रतिनियुक्तीवर आहेत व आता पुन्हा ३४ जणांना प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येत आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. त्यामुळे प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांना परत बोलावणे अपेक्षित असताना पुन्हा दुसरी बॅच प्रतिनियुक्तीवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याठिकाणी सुमारे पन्नास ते साठ अभियंते, कामगार व त्यांचे कुटुंबीय कोरोनाशी लढत आहेत. त्यातील काही मृत्यूमुखी पडले आहेत. कामगार कुटुंबियांमधील अनेकजण कोरोनाबाधित असतानाही तुटपुंज्या कर्मचाऱ्यांवर वीज निर्मितीत सातत्य ठेवण्याचा प्रयत्न येथील प्रशासन करत आहे. वारंवार बदल्यांचे अस्त्र उगारुन नाशिकचे वीज केंद्र कायमचे बंद करण्याचा विचार आहे काय? असा प्रश्न युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी विचारला आहे.