पाटोदा : येथील केंद्रांतर्गत परिसरातील ठाणगाव, पिंपरी, दहेगाव, पाटोदा, सोमठाण देश, आंबेगाव नीळखेडे, शिरसगाव लौकी या गावांमध्ये काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून एकदा वीज गेली तर दिवसभर वीज येत नाही तसेच काहीवेळेस तर पाच मिनिटेदेखील अखंडित वीजपुरवठा केला जात नाही. यामुळे विद्युत उपकरणांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत येथील कार्यालयात विचारणा केली असता काम सुरू आहे, पाच मिनिटात वीज येईल, मनमाड येथूनच पुरवठा बंद केला आहे, अशी उत्तरे दिली जात आहेत. या भागातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.