सुरगाणा : तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे सुरगाणा व शहरासह तालुक्यातील वीजपुरवठा गेल्या चाळीस तासांपेक्षा जास्त काळ खंडित राहिल्याने सर्वांनाच अडचणींचा सामना करावा लागला आहे. तोक्ते वादळाचा तडाखा तालुक्याला देखील बसला आहे. तालुक्यात ठिकठिकाणी घरांचे छप्पर उडाल्याने तर काही ठिकाणी आंबा पिकाचे नुकसान झाल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. या वादळामुळे दिंडोरी कडून सुरगाणा तालुक्याला वीजपुरवठा करणाऱ्या वाहिनीत बिघाड झाला. यामुळे सोमवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान वीजपुरवठा खंडित झाला. सुरगाणा येथे नगरपंचायत कार्यालया पासून काही अंतरावर असलेले तीन विद्युत खांब कोसळले. मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत विद्युत खांब उभे करण्यात येऊन तारा ओढण्याचे काम सुरू होते. सोमवारी सकाळी खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज कर्मचारींना जोरदार पाऊस व वादळ वाऱ्यामुळे अडचणी येत होत्या. तरीही त्यांचे प्रयत्न सुरू राहिले. दरम्यान मंगळवारी रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान वीजपुरवठा सुरू झाला. मात्र तो नियमित राहू शकला नाही. यादरम्यान खंडित वीजपुरवठामुळे नागरिकांना पाण्याची समस्या निर्माण झाली होती. बुधवारी सकाळी उशिरानंतर शहरातील काही भागात वीजपुरवठा सुरू झाला. तर काही ठिकाणी दुरूस्तीचे काम सुरू असल्याने दुपार उलटूनही वीज पुरवठा सुरू झालेला नव्हता. तालुक्यात देखील वीज पुरवठा खंडित झाला आहे.
सुरगाण्यात ४० तासांपेक्षा अधिक काळ वीज पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 2:49 PM