पंचवटी : आडगाव शिवारातील मुंबई आग्रा महामार्गावर हॉटेल जत्रा मागील स्वामी समर्थ नगर, इच्छामणी नगर भागात काही महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
खंडित वीज पुरवठ्याबाबत वारंवार वीज वितरण कंपनीकडे तक्रार केली असता त्यांच्याकडून वरचेवर काम केले जात असल्याने सातत्याने वीज खंडित होत असल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
हॉटेल जत्रा मागे स्वामी समर्थ नगर, इच्छामणी नगर परिसरात साधारण चार ते पाच हजार नागरिकांची वसाहत आहे. येथील नागरिकांना काही महिन्यापासून विजेच्या वारंवार होणाऱ्या लपंडावाला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात तर वादळी वारा यामुळे बिजली गुल होण्याचे प्रमाण कायम असते. मात्र इतरवेळी देखील वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण अधिक आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यास संबंधित नागरिक इंजिनियर अथवा वायरमन यांना फोन करतात. मात्र बहुतांश वेळा संबंधित अधिकारी व कर्मचारी फोन उचलत नाही. वीज पुरवठा खंडित का होतो याबाबत मात्र समाधानकारक उत्तर स्थानिक लोकांना मिळत नाही. त्यातच कोरोनाचे काही रुग्ण देखील या भागात असून काही क्वारंटाईन आहेत. काहींना घरीच ऑक्सिजन लावलेले असल्याने वीज पुरवठा खंडित झाल्यास समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वीज खंडित होण्याच्या प्रकारामुळे नागरिक हैराण झाले असून लवकरात लवकर या समस्येतून सुटका करावी, अशी मागणी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे.