सदर उपकेंद्र कार्यान्वित करण्याच्या मागणीने जोर धरला असून उपकेंद्र कार्यान्वित झाले नसल्याने त्याची झळ शेतकऱ्यांना बसत आहे.
तत्कालीन आघाडी सरकारच्या कालावधीत तत्कालीन ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांनी तत्कालीन आमदार स्व ए. टी. पवार यांच्या मागणीनुसार कनाशी येथे १३२/३३ के व्ही उपकेंद्र २०१४ मध्ये मंजूर केले. महावितरण, महापारेषण यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला मात्र गेल्या ७ वर्षात त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. कनाशीचा प्रस्ताव लालफितीत अडकून पडल्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणीबाबत आमदार नितीन पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन कनाशी येथील के.व्ही.उपकेंद्र कार्यन्वित करण्याबाबत विनंती केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्काळ महापारेषणचे सचिव व कार्यकारी संचालक यांच्याशी संवाद साधून उपकेंद्र कार्यन्वित करण्याचे लेखी आदेश देऊन देखील कामात प्रगती नसल्याने सर्वत्र नाराजीचा सूर आहे.
एप्रिल २०१४ मध्ये कनाशी उपकेंद्राला मंजुरी दिल्यानंतर महापारेषण विभागाने महसूल विभागाकडे कनाशी येथील जागेपोटी १ कोटी १७ लाख रुपयांचा भरणा केला आहे. कनाशी येथील १३२/३३ के. व्ही. उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानंतर कळवण आणि सुरगाणा या दोन तालुक्यातील वीज वितरण समस्येचा प्रश्न मार्गी लागणार असून आदिवासी बांधवांना वीजपुरवठा सुरळीत मिळणार आहे.
सध्या स्थितीत सुरगाणा आणि बोरगाव ह्या उपकेंद्रांना १३२ के व्ही दिंडोरी उपकेंद्रातून वीजपुरवठा जोडण्यात आला आहे. ३३ के व्ही वाहिनीचे अंतर ७५ ते ८० कि.मी असल्याने सुरगाणा येथे कमी दाबाने वीजपुरवठा होतो. कनाशी येथे १३२/३३ के व्ही उपकेंद्र कार्यान्वित झाल्यास कळवण तालुक्यातील दळवट व कनाशी भागात आणि सुरगाणा तालुक्यात वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
इन्फो
वारंवार वीजपुरवठा खंडित
वीज वितरण कंपनीकडून मागील काही दिवसापासून कळवण तालुक्यात कृषिपंप आणि गावांना सुरळीत वीजपुरवठा मिळत नसून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे पिकांना पाणी कसे द्यावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. तालुक्यातील कृषिपंपांची विजेची मागणी वाढली असल्यामुळे तालुक्यात ठिकठिकाणी वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे पिकांना पाणी देणे अवघड होऊन बसले आहे.
कोट.....
कनाशी येथील वीज उपकेंद्रासाठी जागा दिली असून महसूल विभागाने महावितरण, महापारेषण यांना जागा हस्तांतरण केली आहे. गेल्या ७ वर्षांपासून वीज उपकेंद्र कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. कनाशी व बोरगाव परिसरातील ६० ते ७० गावांना या उपकेंद्रांमुळे वीजपुरवठा सुरळीत व नियमित मिळण्यास मदत होईल.
- विजय शिरसाठ,
उपसभापती,
पंचायत समिती कळवण