दिंडोरी : तालुक्यातील ओझरखेड धरण क्षेत्रालगतच्या दहेगाव, वागळुद, लखमापूर येथील शेतीपंपांचा वीजपुरवठा तीन दिवसांपासून महावितरण कंपनीने खंडित केल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. सोमवारी (दि. १५) तहसीलदार पंकज पवार यांना निवेदन देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
दिंडोरी तालुक्यात ऊसतोड व द्राक्ष पिकाचा हंगाम सुरू आहे. ऊसतोड झालेल्या क्षेत्राला तोड झाल्यानंतर लगेच पाणी द्यावे लागते, तर द्राक्ष पिकाला दर दोन-तीन दिवसांतून किमान अर्धा तास पाणी द्यावे लागते. मात्र, दहेगाव, वागळुद, लखमापूरसह ओझरखेड धरण क्षेत्रालगतचा वीजपुरवठा कंपनीने बंद केल्याने शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकार्यांशी चर्चा केली.
मात्र, अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने व वीजबिल भरल्याशिवाय पुरवठा सुरळीत न करण्याची भूमिका घेतल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार पंकज पवार, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आर. एन. बोरुडे यांच्यासमोर कैफियत मांडली. वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही दिला.यावेळी अजित कड, दीपक मोगल, ज्ञानेश्वर कड, निवृत्ती कड, संदीप मोगल, राहुल कड, निवृत्ती मोगल यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.दिंडोरी तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सुरळीत करावा, असे निवेदन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आर. एन. बोरुडे यांना शेतकऱ्यांनी दिले.