नाशिक : चक्रीवाळामुळे सोमवारी शहर जिल्ह्यात वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे महावितरणची यंत्रणा कोलमडून पडल्याने सलग दुसऱ्या दिवशी नागरिकांना खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागला. शहरातील अनेक भागांत चार ते पाच तासांपेक्षा अधिक काळ वीजपुरवठा खंडित झाला होता तर दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. दरम्यान, नादुरूस्त १८ पैकी ११ उपकेंद्रे सुरळीत सुरू करण्यात आल्याचा दावा ‘महावितरण’कडून करण्यात आला.
सोमवारी झालेल्या वादळ वाऱ्यामुळे विस्कळीत झालेला वीजपुरवठा दुसऱ्या दिवशीही अनेक भागांत कायम होता. सातत्याने बंद पडणारे रोहित्र तसेच उपकेद्रांमध्ये हेाणाऱ्या बिघाडामुळे शहर परिसरातील नागरिकांना विस्कळीत वीजपुरवठ्याचा सामना करावा लागला. विशेषत: अंबड वाहिनीवरील ग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा अनुभव आला. सिडको, इंदिरानगर तसेच द्वारका परिसरातील अनेक भागांत विजेचा लपंडाव सुरू होता. सिडकोतील अभियंता नगरला चार तास वीजपुरवठा खंडित झाला होता. वडाळा गावातही वीजपुरवठा विस्कळीत झाल्याच्या तक्रारी ‘महावितरण’कडे करण्यात आल्या.
पंचवटीतील हिरावाडी, तपोवन तसेच म्हसरूळ, गजपंथ या भागातील नागरिकांना देखील विजेचा लपंडाव सुरू असल्याचा अनुभव आला. नाशिकरोड, सामनगाव, शिंदे गावातही दुपारपर्यंत अनेक भागांत वीजपुरवठा हेाऊ शकला नाही.
तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील १८ उपकेंद्रे ,१६५ वाहिन्यांचा ७२२९ रोहित्र आणि अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित होता तर काही भागांत सुरक्षेच्या कारणास्तव महावितरणकडून वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. बंद पडलेल्या १८ पैकी ११ विद्युत उपकेंद्रे, १२३ वाहिन्यांचा, ४५६७ रोहित्रे आणि अनेक गावांचा विद्युत पुरवठा दुपारपर्यंत पूर्ववत करण्यात आल्याचे ‘महावितरण’कडून सांगण्यात आले.
वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी स्पार्किंग होऊन पुरवठा बंद पडला होता. प्रचंड वाऱ्याच्या वेगामुळे दुरुस्ती कार्यात अडथळे निर्माण होत असल्याने वीज यंत्रणा सुरळीत करण्यास विलंब लागला. सायंकाळपर्यंत शहरातील अनेक भागांत वीज यंत्रणा सुरळीत करण्याचे काम सुरू होते.