चांदवड : चांदवड तालुक्यातील शिरूर-तांगडी सबस्टेशनमध्ये अचानक बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. सबस्टेशन अंतर्गत येणारी १७ गावे मंगळवारच्या रात्रीपासून अंधारात बुडाली आहेत. याबाबत वीज वितरण कंपनीकडे चौकशी केली असता वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र या सबस्टेशनवर विजेचा लोड जास्त असल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी परिसरातील शेतकऱ्यांनी केल्या आहेत. शिरूर-तांगडी सबस्टेशन अंतर्गत येणारे मंगरूळ, भरवीर, देणेवाडी, मतेवाडी, आसरखेडे, चिंचोले, तळवाडे, तांगडी, खेलदरी, आडगाव टप्पा आदि १७ गावांसह ३ वाड्याही मंगळवारपासून अंधारात आहेत. एककडे दुष्काळी परिस्थिती असताना विहिरींनी तळ गाठला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. त्यात वीजपुरवठा असलाच तरच शेतीसाठी पाणी देता येते त्यात अनेकवेळा या रोहित्रावरील वीजपुरवठा सारखा खंडित होण्याचा प्रकार यापूर्वीही अनेकवेळा घडला आहे.संबंधित वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून दिली असता, त्यांनी या सबस्टेशनवर विजेचा फार मोठा लोड असल्याने वीजपुरवठा वारंवारखंडीत होत असल्याचे सांगितले. तसेच वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, वीजपुरवठा त्वरित सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)
१७ गावांचा वीजपुरवठा खंडित असल्याने अंधार
By admin | Published: February 10, 2016 10:14 PM