सिडको : खिडक्यांच्या काचा फुटलेल्या, साफसफाई नाही, तसेच शौचालयाची दुरवस्था यांसह अनेक कारणांनी सध्या गाजत असलेल्या अश्विननगर येथील राजे संभाजी क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडिअमधील वीजपुरवठा गेल्या आठ दिवसांपासून महावितरणने खंडित केला आहे. यामुळे वीजपुरवठ्यावर सुरू असलेले सेतू कार्यालय तसेच मैदानातील म्युझिकवर सुरू राहणारे गाणे बंद झाले असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या गोष्टीला तब्बल आठ दिवस उलटूनही ढिसाळ व नियोजनशून्य कारभार असलेल्या मनपाकडून दखल घेतली जात नसल्याने क्रीडाप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अश्विननगर येथील राजे संभाजी इनडोअर स्टेडिअमची संपूर्ण वाताहत झाली असून, सर्वत्र घाण, माती साचलेली, अस्वच्छता, शौचालयाची दुरवस्था झालेली असे असतानाच गेल्या आठ दिवसांपासून बिल न भरल्याने महावितरण कंपनीने इनडोअर स्टेडिअमचा वीजप्रवाह खंडित केला आहे. संपूर्ण इनडोअर स्टेडिअममध्ये धूळ व घाणीचे साम्राज्य पसरलेले असल्याने याबाबत नुकतीच क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त करीत मनपा प्रशासनाचा निषेध नोंदविला. शिवसेनेचे माजी नगरसेवक मामा ठाकरे यांच्या संकल्पनेतून महापालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून राजे संभाजी क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. सेतू कार्यालयदेखील बंद बिल न भरल्याने राजे संभाजी क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडिअमचा वीजपुरवठा गेल्या आठ दिवसांपूर्वी महावितरण कंपनीने खंडित केला असल्याने याच ठिकाणी असलेले सेतू कार्यालयदेखील बंद आहे. यामुळे सेतूसंबंधित कामासाठी येणाºया विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे हाल होत आहेत. याबरोबरच मैदानातील जॉगिंग ट्रॅकवर लावण्यात आलेले म्युझिकल गाणेदेखील बंद झाले आहे.इनडोअर स्टेडिअममध्ये खेळाडूंसाठी राहण्याची व्यवस्था तसेच इतर सुविधा करणे अपेक्षित होते; परंतु निधी उपलब्ध नसल्याचे कारण मनपाकडून सांगण्यात येत आहे. सध्या थंडीचे दिवस असल्याने इनडोअर गेम खेळण्यासाठी सकाळपासून क्रीडाप्रेमींची गर्दी होते. मैदानालगतच उभारण्यात आलेल्या जॉगिंग ट्रॅकवरही नागरिक सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी येतात. याठिकाणी मनपाने बास्केटबॉल, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल व अंतर्गत खेळ खेळण्यासाठी इनडोअर स्टेडिअम उभारले आहे.परंतु आजही याठिकाणी एका खासगी शाळेच्या कार्यक्रमासाठी हे इनडोअर स्टेडिअम भाड्याने दिले असल्याचे दिसून आले आहे. या इनडोअर स्टेडिअममध्ये इनडोअर खेळ होणे अपेक्षित असताना महापालिका मात्र हे इनडोअर स्टेडिअम खासगी कार्यक्रमांसाठी भाड्याने देत असल्याने क्रीडापे्रमींनी नाराजी व्यक्त केली आहे असून याबाबत कारवाईची मागणी होत आहे.
संभाजी क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडिअमचा वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:52 AM