लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जुने नाशिक भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने या परिसरातील व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यासंबंधी वीज महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही दुर्लक्ष होत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. भद्रकाली वीज वितरण विभागात शहराचा मध्यवर्ती असलेला भाग रविवार पेठ, आंबेडकर कॉलनी, घनकर लेन, एमजीरोड, मेनरोड, शालिमार, खडकाळी हा परिसर येत असून, सदरचा परिसर हा व्यापारी पेठेचा आहे. या ठिकाणी शाळा, निमशासकीय कार्यालये, खासगी व शासकीय रुग्णालये तसेच काही रहिवासी क्षेत्राचा समावेश आहे. या ठिकाणी गेल्या महिन्यात पावसाळ्याच्या प्रारंभी वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. यासंबंधी वाल्मीकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीच्या वतीने उपकार्यकारी अभियंता, महावितरण भद्रकाली विभाग यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर काहीकाळ वीजपुरवठा सुरळीत झाला. पुन्हा पावसाळ्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. थोडा जरी पाऊस आला तरी वीजपुरवठा खंडित होत आहे. तसेच काही ठिकाणी रोहित्राचा स्फोट होण्याची शक्यता आहे. याबाबत गंभीर दखल घेऊन कायमस्वरूपी वीजपुरवठा करण्याची मागणी होत आहे. यासंबंधीच्या निवेदनावर सुरेश मारू, जयसिंग मकवाना, श्रीकांत बाबरिया, प्रकाश खेर, अनिल वानिया, जितू मारू, अमित चव्हाण, आनंद चव्हाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
जुने नाशिक परिसरात वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:00 AM