शिवडे ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे पुरस्कृत गटाने ११ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली. सरपंचपद हे सर्वसाधारण पुरुषासाठी राखीव असल्याने शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी ए.एस. सहाणे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा पार पडली.
सरपंचपदासाठी प्रभाकर तुकाराम हारक यांनी अर्ज दाखल केला. सूचक म्हणून तेजस परशराम वाघ यांची स्वाक्षरी होती, तर उपसरपंचपदासाठी राजेश्वरी भगवान वाघ यांनी अर्ज दाखल केला. सूचक म्हणून योगिता उत्तम हारक यांची स्वाक्षरी होती. निर्धारित वेळेत दोनच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ए.एस. सहाणे यांनी दुपारी सदर निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. या निवडणुकीसाठी बुधाजी कातोरे, नीलेश सोनकांबळे, विठाबाई कातोरे, पूनम चव्हाणके, संजय वाघ, सुनीता वाघ हे सदस्य सभेसाठी हजर होते, तर तीन सदस्य गैरहजर होते. निवडीनंतर शिवडे ग्रामस्थांनी जल्लोष केला.
फोटो ओळी- सिन्नर तालुक्यातील शिवडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रभाकर तुकाराम हारक यांची तर उपसरपंचदी राजेश्वरी भगवान वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याप्रसंगी जल्लोष करताना सदस्य.