लोकमत विशेषनाशिक : नाशिकला वारसास्थळांचा जिल्हा म्हटलं तर वावगं होणार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातील जिवंत इतिहास येथील ख्रिस्ती दफनभूमीतील कबरींभोवती दडलेला आहे. हा इतिहास जाणून घेण्यासाठी राज्य पुरातत्व विभागाने सकारात्मकता दर्शविली असून, त्यादृष्टीने लवकरच पाहणी दौरा केला जाणार आहे.नाशिक शहरातील एकमेव ख्रिस्ती दफनभूमी सारडा सर्कल या भागात आहे. या दफनभूमीमध्ये प्रवेश करताच पांढऱ्या संगमरवरी दगडात आकर्षक पद्धतीने बांधलेली लेप्रसी निर्मूलन मिशनच्या रोसाली हार्वे यांची १९३२ सालची कबर नजरेस पडते. जणू ही कबर ख्रिस्ती धर्मीयांच्या आरोग्यसेवेची साक्षच देते. उजव्या बाजूच्या पायवाटेने पुढे गेल्यास काळ्याभोर दगडामध्ये भक्कम बांधकाम असलेल्या पुरातनकबरी गाजरगवताआडून दृष्टीस पडतात. ‘ब्रिटिश कोटा’ असे या भागाचे नाव आहे.‘जॅक्सन’ची कबरही याच दफनभूमीतस्वातंत्र्य चळवळीचे नाशिक हे अत्यंत महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात नाशिकसोबत विविध घटनांचा संदर्भ जोडलेला आहे. त्यामध्ये येथील विजयानंद चित्रपटगृहात २१ डिसेंबर १९०९ साली हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी आॅर्थर मेसन तिप्पेटस जॅक्सन याची गोळ्या झाडून हत्या केली होती. जॅक्सन याची कबरही या दफनभूमीत पहावयास मिळते.या भागात स्वातंत्र्यानंतर ख्रिस्ती समाजबांधवांसाठी दफनविधीला मुभा देण्यात आलेली नाही. हा भाग आजही राखीवच आहे. या भागातील इंग्रज अधिकाºयांच्या कबरींचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अप्रतिम स्थापत्य. वेगवेगळ्या आकारांमध्ये काळ्या दगडात बांधण्यात आलेल्या कबरी लक्ष वेधून घेतात.प्रत्येक कबरीवर त्या अधिकाºयाची इत्यंभूत माहिती इंग्रजीमध्ये कोरलेली दिसते. बहुतांश कबरींची काळानुरूप पडझड झाली आहे. हा ऐतिहासिक ठेवा सुरक्षित रहावा, जेणेकरून भारतीय स्वातंत्र्यपूर्व इतिहासामध्ये अधिक माहितीची भर पडण्यास मदत होईल. राज्य पुरतत्व विभागाने यासंदर्भात माहिती घेऊन या कब्रस्तानला भेट देऊन येथील पुरातन कबरींची पाहणी केली जाणार असल्याची माहित्री सूत्रांनी दिली.शहरातील वारसा स्थळांच्या यादीत या दफनभूमीतील पुरातन कबरींचाही समावेश होण्याची शक्यता आहे. कारण पुरातन कबरी, त्यांचे बांधकाम आणि इतिहास हा दुर्मीळ असून त्याचा अभ्यास पुरातत्व खात्याकडून केला जाणार आहे.
ब्रिटिशकालीन कबरींचा पुरातत्व विभाग करणार अभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:07 AM