नाशिक : माजी विद्यार्थिनीला महाविद्यालयाची शिक्षक म्हणून दाखवून वाढीव शुल्क मंजूर करून घेण्याचा धक्कादायक प्रकार येवल्याच्या जगदंबा शैक्षणिक संस्थेत घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी संस्थाचालक व प्राचार्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश येवल्याच्या प्रथम वर्ग न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. शिक्षण बाजारीकरणविरोधी मंचाने पत्रकार परिषदेत सदर माहिती दिली. त्यानुसार, येवला येथील एस.एन.डी. डिग्री व डिप्लोमा फार्मसी महाविद्यालयात स्नेहल गाडेकर या विद्यार्थिनीने सन २०१२ मध्ये बी. फार्मचे शिक्षण पूर्ण केले. या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी माहितीचा गैरवापर व खोट्या स'ा करून गाडेकर हिला महाविद्यालयाची शिक्षक म्हणून दाखवले व शिक्षण शुल्क समितीकडून वाढीव शुल्क मंजूर करून घेतले. गाडेकर हिचे बंधू प्रा. सचिन गाडेकर यांनी यासंदर्भात शिक्षण शुल्क समितीकडून माहितीच्या अधिकाराअंतर्गत कागदपत्रे मिळविली. त्यांचा अभ्यास केल्यानंतर महाविद्यालयाने वाढीव शुल्क मंजूर व्हावे, यासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याची, महाविद्यालयाची मान्यता अबाधित राखण्यासाठी व खर्च वाढवून दाखवण्यासाठी गाडेकर ही प्रत्यक्षात तेथे कार्यरत नसतानाही तिचे नाव शिक्षकांच्या यादीत दाखविल्याची बाब पुढे आली. याबाबत गाडेकर हिने संस्थेकडे दाद मागितली. तेथे तक्रारीची दखल घेण्यात न आल्याने पोलिसांकडे मदत मागितली. तेथेही दाद न मिळाल्याने अखेर न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली. त्यात संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, सचिव लक्ष्मण दराडे, संचालक किशोर दराडे, प्राचार्य नितीन जैन, संस्था समन्वयक समाधान झाल्टे, प्राचार्य स्वाती रावत व अन्य व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. या अर्जाची सुनावणी प्रथम वर्ग दंडाधिकारी न्यायमूर्ती ए. डी. थोरात यांच्यासमोर झाली. गाडेकर हिच्या वतीने पुण्याचे अॅड. मनोज नायक यांनी बाजू मांडली. सुनावणीनंतर न्यायालयाने संबंधितांवर गुन्हे दाखल करून त्याचा अहवाल न्यायालयास सादर करण्याचे आदेश येवला पोलिसांना दिले आहेत. पत्रकार परिषदेस श्रीधर देशपांडे, अॅड. मनोज नायक, छाया देव, प्रा. मिलिंद वाघ, स्नेहल गाडेकर आदि उपस्थित होते.
माजी विद्यार्थिनीला शिक्षक दाखवून गैरव्यवहार
By admin | Published: May 15, 2015 12:05 AM