येवला : महाराष्टÑ राज्यात ३४५२ धरणे असून, यात केवळ ११८० टीएमसी पाणी साठते, जल व्यवस्थापनामध्ये नियोजनाचा अभाव आणि यातील राजकीय हितसंबंध आड येत असल्यामुळे शेती उजाड होत चालली असून, महाराष्टÑ राज्याची वाटचाल वाळवंटीकरणाकडे सुरू असल्याचा गंभीर इशारा औरंगाबाद येथील वा एमी या शासकीय पाणी व्यवस्थापन क्षेत्रातील सेवानिवृत्त अभियंता आणि जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी येथे बोलताना दिला. येथील समता प्रतिष्ठान ही शिक्षण संस्था चालवित असलेल्या शाळांच्या समता फेस्टिव्हलचा समारोप समारंभ झाला. यावेळी पाणी अडवा, पाणी वाचवा, या विषयावर विशेष चर्चा झाली. यावेळी पुरंदरे बोलत होते. यावेळी कवी अरुण म्हात्रे उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते कुंडीतील रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. पाणी याच विषयावर संस्थेच्या विविध विद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी पथनाट्य, नृत्यगीते आणि गाणी सादर करून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी बोलताना पुरंदरे म्हणाले महाराष्टÑात उपलब्ध पाण्याचा वापर दुष्काळग्रस्त राज्याने जितका घ्यायला हवा तितका प्रत्यक्षात तो घेतला जात नाही. महाराष्टÑ एकमेव राज्य आहे की, जिथे पाणी वापराचे कोणतेही नियम वा नियोजन नाही. महाराष्टÑात जलव्यवस्थापन केले जात नाही. पाण्यासारख्या नैसर्गिक आणि अनमोल संपत्तीचे नियोजन नसणे ही धक्कादायक, क्लेषकारक बाब आहे. आज प्रश्न जलहित संबंधाचा निर्माण झालेला आहे. औद्योगिकीकरणासाठी आणि शहरात मुबलक पाणी वळविले जाते, परंतु ज्या ग्रामीण भागात धरणे, तळे, बंधारे आदींमुळे पाणी अडविले जाते त्यांना पाणी देणे राज्यकर्त्यांना महत्त्वाचे वाटत नाही. गावागावात नदी खोलीकरण, जलसंधारणाची कामे केल्याच्या जाहिराती झळकतात, परंतु प्रत्यक्षात काम दिसत नाही. पाणी नियोजन आणि पाण्याकडे पाहण्याची मानसिकता आहे ती उदासीन असलेले राज्य म्हणून महाराष्टÑाकडे बघितले जात असल्याची खंत पुरंदरे यांनी यावेळी व्यक्त केली. जगातील कोणतीही वस्तू तयार करण्यासाठी पाणीच लागते. एक किलो साखर तयार करण्यासाठी २५०० लिटर पाणी लागते, आणि साखर कारखाने जेव्हा एक किलो साखर निर्यात करतात तेव्हा ते २५०० लिटर पाणीच निर्यात करीत असतात. ज्या देशाच्या उत्पादनातून पाण्याचे एवढे प्रचंड नुकसान होते, तो देश वा राज्य वाळवंट होणार नाही तर काय होईल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. समता प्रतिष्ठान या शिक्षण संस्थेने मनोरंजनातून लोकशिक्षण करण्याचा घेतलेला वसा फारच अफलातून आणि दुर्मीळ असल्याचे पुरंदरे म्हणाले. याप्रसंगी कवी अरुण म्हात्रे यांनी कविता सादर करून उपस्थिताना मंत्रमुग्ध केले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार मारोतीराव पवार, अरुण गुजराथी, रायभान काळे, अंबादास बनकर, प्रकाश देवरे, अजय विभांडिक आदी उपस्थित होते.
राज्यात जलनियोजनाचा अभाव प्रदीप पुरंदरे : येवल्यातील समता फेस्टिव्हलच्या समारोपप्रसंगी नृत्य, नाटिकेद्वारे प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 12:23 AM
येवला : महाराष्टÑ राज्यात ३४५२ धरणे असून, यात केवळ ११८० टीएमसी पाणी साठते.
ठळक मुद्दे समता फेस्टिव्हलचा समारोप सांस्कृतिक कार्यक्रम सादर