लोकमत न्यूज नेटवर्कघोटी : शरीराबरोबर मनाचाही व्यायाम होणे गरजेचे असून, यासाठी योगासने करणे हे उत्तम साधन असल्याने गेल्या काही वर्षांपासून योगासनांना वाहून घेतलेल्या नाशिक येथील प्रज्ञा पाटील यांनी तब्बल १०३ तास सलगपणे योगासने करून विश्वविक्र म केल्याची नोंद गिनिज बुकामध्ये करण्यात आली. मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता सलग योगासनांचे १०३ तास संपल्यानंतर उपस्थित योगाप्रेमींनी एकच जल्लोष केला. इगतपुरीजवळील पिंप्री सदो या गावानजीक हा विश्वविक्र म नोंदविण्यात आला. नाशिकच्या ४८ वर्षीय योगाशिक्षिका प्रज्ञा पाटील यांनी सतत १०० तास योगासने करून एक नवा इतिहास रचण्याचा संकल्प केला होता.यानुसार शुक्र वार दिनांक १६ जून रोजी पहाटे साडेचार वाजता त्यांनी या योगासनांना प्रारंभ केला.विविध योगासने करीत त्यांनी रविवार दिनांक १८ रोजी दुपारी दीड वाजता तामिळनाडूच्या के.पी.रचना यांचा ५७ तासाचा विक्र म मोडीत काढला. त्या पाठोपाठ त्यांनी डॉ. व्ही.गणेशकरण यांचाही ६९ तासाचा विक्र म मोडीत काढला.दरम्यान मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता त्यांनी योगासनांचे सलग शंभर तास पार केले.मात्र तेथेच न थांबता त्यांनी १०३ तासांचा विक्र म पूर्ण करीत या विक्र माची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केली. विश्वविक्र मात नोंद झाल्यानंतर उपस्थित योगाप्रेमींनी एकाच जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा केला.गिनीज बुकचे प्रतिनिधी स्वप्नील डांगरीकर यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी आमदार देवयानी फरांदे,प्रा.डॉ.मीनाक्षी गवळी,उद्योजक अविनाश गोठी, रोहिणी नायडू भाजपाच्या शहर उपाध्यक्ष सोनल दगडे,संध्या शिरसाट,मनोरमा पाटील,दीपाली गवांदे,अश्विनी डोंगरे,मीनाक्षी अहेर,वंदना रकीबे,गौरव पाटील,गौरागी पाटील आदी उपस्थित होते.योगसाधनेला जागतिक कीर्ती मिळावी आणि नाशिक जिल्ह्याची जागतिकस्तरावर नवी ओळख व्हावी यासाठी आपण शंभर तास योगासने करण्याचा संकल्प केला होता. ज्या वयात माणसाला शरीर साथ देत नाही त्या वयात सलगपणे योगासने करणे म्हणजे एक आव्हानच होते.मात्र योगप्रेमी आणि कुटुंबातील सदस्य आणि मित्रपरिवार यांनी दिलेल्या धैर्यामुळे हा विक्र म करणे शक्य झाले.-प्रज्ञा पाटील, योग प्रशिक्षक, नाशिक