विठुमाऊली आणि आवलीच्या आख्यायिकेचा आधार घेऊन प्राजक्त यांनी केलेल्या संगीत देवबाभळी या नाटकाला आणि देवबाभळी पुस्तकाला ‘क्लास आणि मास’ बरोबरच राजमान्यतादेखील मिळाली. देवबाभळी या कलाकृतीला आतापर्यंत ४१ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून हा ४२वा सन्मान आहे. महाराष्ट्र शासनाचा विजय तेंडुलकर पुरस्कारही प्राजक्त यांना मिळालेला असून तीन दिवसांपूर्वी केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाची स्वायत्तसंस्था असलेल्या साहित्य अकादमीचा युवा पुरस्काराने या कलाकृतीवर राष्ट्रीय मान्यतेची मोहोर उमटली आहे. चार वर्षांपूर्वी केवळ नाशिकरोड आणि नाशिकच्या परिघातही फारसे कुणाला परिचित नसलेले प्राजक्तचे नाव आता राज्यातच नव्हे देशात झळकू लागले आहे. तसेच एकाच साच्यात स्वत:ला बसवून न घेता नाटकाबरोबरच चित्रपट कथा, संवादलेखन, दिग्दर्शन अशा सर्व प्रांतात मुशाफिरी करणारा प्राजक्त अधिकच जोमाने आणि सर्वांगाने बहरू लागला आहे.
इन्फो
आख्यायिका ते नाट्य
या आख्यायिकेत तुकोबांना न्याहरी घेऊन चाललेल्या आवलीच्या पायात काटा रुततो अणि ती बेशुद्ध पडते. त्यानंतर विठ्ठलाच्या आज्ञेवरून आणि तुकोबांच्या विनंतीला मान देऊन रखुमाबाई ही लखूबाई बनून आवलीला घेऊन घरी येते. तिचा पाय बरा होईपर्यंत तिची शुश्रूषा करते. तिला घरकामात मदत करते. यादरम्यान दोघी बोलतात. या संवादातूनच त्या एकमेकींना समजून घेताना त्यांना येणारे आत्मभान असा हा आलेख नाटकातून आणि पुस्तकातून मांडण्यात आला आहे.
--------------------
धनंजय रिसोडकर
२६प्राजक्त