इंदिरानगर : पांडवलेणीवरून पडलेल्या मुलास याठिकाणी फिरण्यासाठी आलेल्या सहा डॉक्टरांनी जीवदान दिल्याची घटना रविवारी (दि़११) सकाळी घडली़ ऋषिकेश सरोदे (१६) असे जीवदान मिळालेल्या मुलाचे नाव आहे़सरोदे हा युवक मित्रांसमवेत रविवारी सकाळी फिरण्यासाठी पांडवलेणी येथे आला होता़ पांडवलेणीवर फिरत असताना अचानक त्याचा पाय घसरल्याने तो डोंगरावरून सुमारे शंभर फूट खाली घसरत गेला व एका वृक्षात अडकला़ या ठिकाणी फिरण्यासाठी आलेले डॉ. अजय जाधव, डॉ. प्रशांत परदेशी, डॉ. पंकज बदाने, डॉ. अभिजित इंगळे, डॉ. हेमंत बोरसे, डॉ. अमोल आहेर यांच्या ही घटना लक्षात आली़ त्यांनी तत्काळ अग्निशमन दलातील कर्मचारी व पोलीस यांना माहिती दिली़या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जगदीश गावित, सुनील बोडके व अग्निशामक दलातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते़ त्यांनी तत्काळ रोप-वे द्वारे ऋषिकेशला सुखरूप बाहेर काढले़ या घटनेमुळे घाबरलेल्या ऋषिकेशला डॉक्टरांनी धीर देत त्याच्यावर प्रथमोपचार केले़
पांडवलेणीवरून पडलेल्या मुलाचे वाचविले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 1:27 AM