नाशिक : नियम डावलून बदली केल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या महिला तलाठ्याकडे प्रांत अधिकाऱ्यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा निंदनीय प्रकार पालकमंत्र्यांच्याच येवला तालुक्यात घडल्याने महसूल विभागात या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या बदलीप्रकरणी संबंधित तलाठी महिलेने मॅटकडे धाव घेतली असून २३ ऑगस्टपर्यंत त्यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे.
याप्रकरणी संबंधित महिला तलाठ्याने गंभीर स्वरूपाचे आरोप केल्याने संपूर्ण जिल्ह्यात महसूल विभागातील या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. बदली करण्यात आल्याप्रकरणी संबंधित महिला तलाठ्याने प्रांतधिकाऱ्यांकडे कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी घरी बोलावून अंगलट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरेाप या महिला तलाठ्याने केला आहे. इतकेच नव्हे तर अनेकदा काही सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी आपणाशी संपर्क साधण्याचा व बदली रद्दची मागणी मान्य होऊ शकते असा निरोप धाडल्याचा आरेापही केला आहे. याप्रकरणी महिला तलाठीने केलेल्या आरोपाचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
नियमबाह्य पद्ध्तीने आपली बदली नांदगाव तालुक्यात करण्यात आली असून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या इच्छेला आपण दाद दिली नसल्यानेच त्यांनी आपली बदली केल्याचा आरोप संबंधित तलाठी महिलेने केला आहे. या घटनेनंतर त्यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना भेटून बदलीतील अन्याय आणि उपविभागीय अधिकाऱ्याच्या वर्तणुकीविषयी तक्रार करण्याचा प्रयत्न केला केला आहे. मात्र आता मॅटमध्ये प्रकरण असल्याने मॅट न्यायालयच याबाबत निर्णय घेईल असे उत्तर त्यांनी संबंधित पीडित महिला तलाठीला दिले असल्याचे समजते.
दरम्यान, येवला उपविभागीय अधिकाऱ्यांनी या सर्व प्रकरणाचा इन्कार केला असून झालेल्या बदल्या या नियमानुसारच असल्याचा दावा केला आहे. तसेच आपणावर दबाव टाकला जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची प्रतिक्रिया मात्र मिळू शकली नाही.
--इन्फो--
६० हजार रुपयांच्या लाचेचीही तक्रार
आणखी एका तलाठी महिलेने येवला उपविभागीय अधिकाऱ्यांविषयी लाच मागितल्याची तक्रार केली आहे. सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओमध्ये दफ्तरतपासणी दरम्यान आपणाकडे ६० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या दोन गंभीर स्वरूपाच्या तक्रारींमुळे महसूल विभागात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.