नाशिक: पंचवटीतील तपोवन परिसरात गत चार वर्षांपासून सुरू असलेल्या बीएपीएस स्वामीनारायण मंदिराचे काम पूर्ण झाले असून रविवारी (दि. २५) प्रासाद प्रवेश विधी पार पडला. कोरोना कालावधी वगळता सलग अडीच वर्षे दिवसरात्र मंदिराचे काम सुरू होते. संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारपासून (दि. २३) मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सवास सुरुवात झाली.
महोत्सवांतर्गत रविवारी प. पू. साधू भक्तीप्रियदास स्वामींच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रासाद प्रवेश विधी करण्यात आला. सोमवारी (दि. २६) विश्वशांती महायज्ञ होईल. मंगळवारी (दि. २७) विश्वशांती महायज्ञ व भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. महोत्सवातील मुख्य वेदोक्त मूर्ती प्रतिष्ठाविधीचे बुधवारी (दि. २८) आयोजन करण्यात आल्याची माहिती तीर्थस्वरूप स्वामी यांनी दिली.
दहा हजार भाविक राहणार उपस्थिती -स्वामीनारायण मंदिरात दहा दिवस आयोजित प्राणप्रतिष्ठा महोत्सवात नाशिकसह देश-विदेशातील सुमारे दहा हजार हरिभक्त उपस्थित राहणार आहेत. महोत्सव शांततेत व्हावा यासाठी एक हजार स्वयंसेवक कार्यरत आहे. सोहळ्यासाठी तीनशेहून अधिक संतगण उपस्थित झाले आहेत. भाविकांसाठी महाप्रसाद, निवास, औषधोपचाराची सुविधा ट्रस्टकडून करण्यात आली आहे.