नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या मे महिन्यात घेण्यात आलेल्या साहित्यभूषण परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, या परीक्षेत नाशिक येथील कवी प्रशांत दत्तात्रय केंदळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. यवतमाळ येथील तोष्णा महेश मोकडे या द्वितीय, तर ठाणे येथील सुनीती अरविंद पेंडसे व पालघर येथील अनिता जेरोम लोपीस या तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. वाचनसंस्कृती समृद्ध, व्यापक करण्याच्या उद्देशाने कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने मे १९९६ पासून ही परीक्षा सुरू करण्यात आली. कथा, कादंबरी, ललित गद्य, नाटक, काव्य, मराठी भाषेचे उपयोजन आदि मराठी साहित्यातील विविध वाङ्मय प्रकारांवर आधारित सहा अभ्यासपत्रिकांचा अभ्यासक्रम या परीक्षेसाठी निश्चित करण्यात आला आहे. दरवर्षी मे महिन्यात ही परीक्षा घेतली जाते. परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण उमेदवाराला अनुक्रमे इंद्रायणी, गोदामाता व कृष्णामाई पुरस्काराने गौरवण्यात येते. यंदा केंदळे यांना इंद्रायणी, मोकडे यांना गोदामाता, तर पेंडसे व लोपीस यांना कृष्णामाई पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. तसेच प्रथम आलेल्या केंदळे यांना साहित्यभूषण परीक्षा समितीचे माजी अध्यक्ष कै. चंद्रकांत वर्तक यांच्या नावाने दिला जाणारा दोन हजार रुपयांचा पुरस्कारही प्रदान केला जाणार आहे. पुरस्कार व प्रमाणपत्र वितरण समारंभ लवकरच आयोजित केला जाणार असल्याचे साहित्यभूषण समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप धोंडगे, कार्यवाह किशोर पाठक यांनी कळवले आहे.
साहित्यभूषण परीक्षेत प्रशांत केंदळे प्रथम
By admin | Published: September 30, 2015 12:17 AM