नाशिक : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेच्या वतीने देण्यात येणारा वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार लेखक प्रशांत दळवी, प्रा. वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी आणि बाबूराव सावंत नाट्यकर्मी पुरस्कार आमदार हेमंत टकले यांना जाहीर झाला आहे. मे महिन्यात पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती नाट्य परिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. नाट्य परिषद नाशिक शाखेच्या वतीने दर दोन वर्षांनी रंगभूमीवर उल्लेखनीय योगदान देणाºया रंगकर्मींना वि. वा. शिरवाडकर लेखन, प्रा. वसंत कानेटकर रंगकर्मी व बाबुराव सावंत पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पुरस्काराचे स्वरूप वि. वा. शिरवाडकर लेखन व प्रा. वसंत कानेटकर रंगकर्मीसाठी २५ हजार रुपये, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे आहे. स्थानिक रंगकर्मींसाठी गेल्या दोन वर्षांपासून बाबूराव सावंत पुरस्कार देण्यात येत आहे. त्या पुरस्काराचे स्वरूप ११ हजार, स्मृतिचिन्ह असे आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक नेताजी भोईर, कुमुदताई अभ्यंकर यांना याआधी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यंदा या बाबुराव सावंत पुरस्काराचे तिसरे वर्ष असून, पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी हेमंत टकले यांना जाहीर झाला आहे. टकले यांचे रंगभूमीवरील तसेच स्थानिक पातळीवर कलावंतांचे प्रश्न सोडविण्यात ते अग्रेसर राहिले आहेत. पत्रकार परिषदेस नाट्य परिषदेचे सुनील ढगे, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, कलावंत सचिन शिंदे, राजेश शर्मा आदी उपस्थित होते. नाशिककर कलाप्रेमींनी पुरस्कार सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन नाट्य परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. एप्रिल किंवा मे महिन्यात पुरस्काराचे वितरण होणार असून नाट्य संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना सन्मानित करण्यात येईल. दळवी यांनी ‘चारचौघी’, ‘ध्यानीमनी’, ‘चाहूल’, ‘सेलिब्रेशन’ तसेच ‘गेट वेल सून’ यांसह ‘मदर्स हाउस’, ‘पौंगड’, ‘दगड का माती’ प्रायोगिक नाटकांसाठी लेखन केले. ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांनी नाट्य, चित्रपट व मालिका यामध्ये स्वैर मुशाफिरी करत आपल्या अभिनयाने स्वतंत्र ठसा उमटविला. गौरीनंदन थिएटर्सच्या माध्यमातून त्यांनी ‘गजरा’, ‘डिटेक्टिव्ह जयराम’ या मालिका तसेच ‘भटाच्या चालीने’, ‘मनोमनी’, ‘गाढवाचं लग्न’, ‘गुड बाय डॉक्टर’, ‘रु सवा सोड सखे’ ही त्यांची गाजलेली नाटके. विविध व्यावसायिक नाटकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.
प्रशांत दळवी, मोहन जोशी यांना नाट्य परिषदेचे पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 1:27 AM