सोलापूर : सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ़ प्रवीण गेडाम यांची नाशिक मनपा आयुक्तपदावर बदली करण्यात आली आहे़ अद्याप सोलापूरचे जिल्हाधिकारी कोण हे निश्चित झाले नाही़ दोन वर्षे होण्यापूर्वीच गेडाम यांची बदली झाली आहे़गेडाम यांची २५ जानेवारी २०१३ रोजी सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती़ त्यानंतर त्यांनी दीड वर्षात वाळू माफिया, दगडखाण माफिया यांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडली़ त्यामुळे शासनाच्या तिजोरीत करोडो रुपयांचा महसूल जमा झाला़ वाळू उपशाबाबत त्यांनी आॅनलाईन सुविधा आणि सॉफ्टवेअर विकसित केल्यामुळे राज्यभर याचे कौतुक झाले़ गेडाम हे २००२ च्या महाराष्ट्र केडरचे आयएएस अधिकारी आहेत़ त्यांनी यापूर्वी जळगाव, लातूर, उस्मानाबाद, पुणे आदी ठिकाणी काम केले आहे़ जळगावात असताना त्यांनी घरकूल घोटाळा बाहेर काढल्यामुळे सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर या मंत्र्यांना तुरुंगात जावे लागले़ उस्मानाबादचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी तुळजापूर देवस्थान परिसरात आमूलाग्र बदल केला़ सोलापुरात गौण खनिज खात्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले़ खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी महसूल मिळवून दिला़ पंढरपूर देवस्थानची अनेक कामे देखील मार्गी लावली आहेत़ एक शिस्तीचे आणि धडाकेबाज अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे़ लातूरमध्ये असताना त्यांनी एकाच दिवशी सर्व शाळांची पटपडताळणी घेऊन खळबळ निर्माण केली होती़
नाशिक महापालिका आयुक्तपदी प्रवीण गेडाम
By admin | Published: November 05, 2014 10:43 PM