मालेगाव (शफीक शेख) : राज्यात कोरोना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुस्लीम बांधवांनी रमजान ईदची नमाज घरातच अदा करावी. शासनाच्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी नागरिकांनी कुठेही गर्दी करू नये. ईदगाह मैदानावर कुणी जाऊ नये. घरातच ईबादत करावी, असे आवाहन मालेगावातील प्रमुख मौलानांनी केले आहे. त्यामुळे यंदाही मुस्लीम बांधवांना आपल्या राहत्या घरातच नमाज पठण करीत कुटुंबीयांसमवेत ईद साजरी करावी लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून नागरिक ईदचे साहित्य आणि नवे कपडे घेण्यासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडत होते. मात्र, कडक लॉकडाऊनमुळे आबालवृद्धांना कोरोनाच्या सावटाखाली घरातच नमाज पठण करीत ईद साजरी करावी लागत आहे.
-------------
राज्यात कोरोनामुळे भयावह परिस्थिती आहे. मालेगावकर नागरिकांनी गेल्यावर्षी कोरोनावर मात करून एक आदर्श निर्माण केला आहे. यंदा देखील शहरातील मुस्लीम बांधव आपापल्या घरातच ईदची नमाज अदा करतील. नागरिकांनी घरातच ईबादत करावी. घराबाहेर कुणी पडून गर्दी करणार नाही. कुठेही जमाव जमणार नाही. ईदगाह मैदानाकडे नमाज पठणासाठी कुणी जाऊ नये. कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहील याची काळजी घ्या. कोरोनावर विजय मिळविण्यासाठी अल्लाहकडे प्रार्थना केली जाईल.
----- मौलाना मुफ्ती मोहमद इस्माईल, आमदार
----------------------------------–----------
शासनाने कडक लॉकडाऊन लावले आहे. शासनाने मुस्लीम बांधवांना घरातच नमाज अदा करण्याचे आदेश दिले आहेत. मशिदीत केवळ चारच जणांना नमाज पठण करण्याचे आदेश आहेत. घराघरातच नमाज अदा करावी. घरीच ईबादत करा. ईदगाह मैदानाकडे कुणी जाऊ नये याची काळजी घ्या. गल्लीतही गर्दी करू नका. कोरोना संपविण्यासाठी सर्वधर्मीय प्रार्थना करतील. शहराची तसेच आपल्या घरातील सदस्यांची काळजी घ्या. शासनास सहकार्य करा.
-युसुफ मौलाना
–------------ --- - - - -------------
कोविडमुळे शासनाने काही गाईड लाईन्स दिल्या आहेत. त्याचे पालन करणे आपले कर्तव्य आहे. यासाठी कुल जमाती तंजीमने निर्णय घेतला आहे की सर्व मुस्लीम बांधव घरात बसूनच ईबादत आणि नमाज पठण करतील कोरोनाचे संकट वाढत असताना कुणीही ईदगाह मैदानाकडे जाणार नाही आम्ही शासनाच्या निर्णयाचे स्वागत करतो. सुन्नी जमातुलनेही शासनाच्या निर्णयाचे स्वागत करून कुणीही नमाज पथनास ईदगाह मैदानाकडे जाणार नाही, असे आवाहन केले आहे.
-मौलाना नुरुल साबरी:
---------–------------------------------
सौदीत ईद झाल्यावर शुक्रवारी रमजान ईद साजरी होईल. शहरातील कोणत्याही ईदगाह मैदानावर नमाज पठण होणार नाही. मशिदीत नमाज पठण होईल. कोरोनामुळे देशाची अवस्था वाईट आहे. नागरिकांनी स्वतःची आणि शहराची काळजी घ्यावी. शासनाच्या नियनांचे पालन करणे आपले कर्तव्य आहे. लोकांनी देशाचा विचार केला पाहिजे. सर्वांच्या सुखदुःखात सहभागी झाले पाहिजे. नागरिकांनी तोंडाला मास्क वापरावा. घरातून बाहेर पडू नये.
-मौलाना आयुब कासमी