नाशिक : महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बंद केलेली महापालिकेतील पूर्व लेखापरीक्षण पद्धती पूर्ववत सुरू करण्यात येणार असून, सोमवाारी निर्णय स्थायी समितीने (दि.२२) घेतला. लेखापरीक्षण विभागासाठी मानधनावर अथवा कंत्राटी पद्धतीने लेखापरीक्षकांची भरती करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला.महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक सोमवारी (दि.२२) अध्यक्ष उद्धव निमसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी तुकाराम मुंढे यांचा निर्णय फिरवण्यात आला. मनुष्यबळाअभावी प्रलंबित लेखापरीक्षण पूर्ण करण्यात येणाऱ्या अडचणी आणि दोनवेळा अभिप्राय घेण्यासाठी वाढणारा फायलींच्या प्रवासाचे कारण देत तत्कालीन आयुक्तांनी प्री आॅडिट बंद केले होते.मुळात पुरेसे मनुष्यबळ नाही त्यातच कोणत्याही कामाचे पूर्व आणि कार्योत्तर असे लेखापरीक्षण करावे लागत असल्याने कालापव्यय होतो. त्यातच २०१२ पासूनचे वार्षिक लेखापरीक्षण प्रलंबित असल्याचे कारण देत पूर्व लेखापरीक्षण पद्धती बंद करण्याचा प्रस्ताव मुंढे यांनी गेल्यावर्षी मांडला होता. तो त्यावेळच्या स्थायी समितीने मंजूर केला होता.पूर्व लेखापरीक्षण पद्धतीमुळे अनेक प्रकारच्या अनियमितता आणि गैरव्यवहार टाळता योतात. हे आता नव्या आयुक्तांना पटल्याने त्यांनी प्री आॅडिटचा प्रस्ताव सादर केला होता. सोमवारी (दि.२२) स्थायी समितीने त्यास मंजुरी देतानाच प्रलंबित लेखापरीक्षण वेळेत पूर्ण करता यावे यासाठी लेखापरीक्षकांची २७ पदे मानधनावर भरण्यास मान्यता देण्यात आली.नवे लेखापरीक्षक रुजूमहापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक हरी सोनकांबळे यांची नियुक्ती झाल्यानंतर ते रुजू झाले आहेत. महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक महेश बच्छाव यांची जिल्हा परिषदेत वित्त अधिकारी म्हणून बदली झाली आहे. बच्छाव यांचा स्थायी समितीत सत्कार करण्यात आला.
महापालिकेत पुन्हा सुरू होणार प्री-आॅडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 1:15 AM