नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी (दि. २१) राज्य सेवेची पूर्व परीक्षा घेतली जाणार असून नाशिकमध्ये ४६ केंद्रांवर सुमारे १८ हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांवर प्रत्येक परीक्षार्थीला मास्क, सॅनिटायझर व इतर आवश्यक सुविधा पुरविल्या जाणार असून कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून परीक्षा होणार आहे.
एमपीएससीने यापूर्वी नियोजित केलेली राज्य सेवेची पूर्व परीक्षा गेल्या रविवारी दि. १४ मार्चला होणार होती. मात्र परीक्षेच्या ऐन तोंडावर एमपीएससीने कोरोनाचे कारण देत परीक्षा पुढे ढकलल्याने आठवडाभरापुर्वी राज्यभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.गेल्या अकरा महिन्यात अशा प्रकारे तीन वेळा ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली. त्यामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आयोगाने याची तातडीने दखल घेत २१ मार्चला परीक्षा घेण्याचे जाहीर केले. त्यादृष्टीने सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून परीक्षा घेतली जाणार आहे. प्रत्येक परीक्षार्थीला मास्क, सॅनिटायझर व इतर आवश्यक सुविधा परीक्षा केंद्रावर पुरविल्या जाणार आहेत.
इन्फो-
एमपीएससीसोबतच रेल्वेचीही रविवारी परीक्षा
एमपीएससीने गेल्या आठवड्यात होणारी परीक्षा रद्द करून रविवारी (दि. २१) घेण्याचे नियोजन केले खरे, मात्र रेल्वे भरती मंडळाने यापूर्वीच रविवारी परीक्षा घेण्याचे निश्चित केलेले होते. त्यामुळे आता एकाच दिवशी या दोन्हीही परीक्षा होणार असल्याने दोन्ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या अनेक उमेदवारांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. रेल्वेच्या ३२ हजार जागांसाठी ऑनलाईन परीक्षा होणार असून या दोन्ही परीक्षांसाठी इच्छुकांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे कोणत्या परीक्षेला प्राधान्य द्यावे, असा पेच परीक्षार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.
इन्फो-
शनिवारी अभियांत्रिकी पूर्व परीक्षा
एमपीएसतर्फे घेण्यात येत असलेल्या पूर्व परीक्षेचे नियोजन पूर्ण होऊन ही परीक्षा रविवारी झाल्यानंतर पुढच्याच आढवड्यात २७ मार्चला महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा होणार आहे तर पुढील महिन्यात ११ एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे.
इन्फो-
एमपीएससीच्या उमेदवारांना सूचना -
-परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रवेश करतांना किमान तीन पदरी कापडाचा मुखपटी (मास्क) परिधान करणे अनिवार्य असेल.
-परीक्षा कक्षामध्ये मुखपट, हातमोजे व सॅनिटाईझरची लहान पिशवी असलेले प्रत्येकी एक किट
उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याचा वापर दोन्ही सत्राकरीता (असल्यास) करणे अनिवार्य असेेल.
-परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान स्वच्छता तसेच आरोग्यास हितावह वातावरण राखण्यासाठी हात सतत सॅनिटाईझ करणे आवश्यक राहील .
- कोव्हिड-१९ सदृश्य लक्षणे जसे की ताप, सर्दी, खोकला इत्यादी दिसून येत असल्यास संबधित परीक्षा उपकेंद्रावरील पर्यवेक्षकीय अधिकारी /कर्मचारी यांना आगाऊ कळवावे. अशा उमेदवारांना मुखपट, हातमोजे, फेस शिल्ड, मेडिकल गाऊन, मेडिकल शु कव्हर, मेडिकल कॅप, इत्यादी बाबी समाविष्ट असलेले पीपीई किट
उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच, त्यांची स्वतंत्र परीक्षा कक्षामध्ये बैठक व्यवस्था करण्यात येईल.
- शारीरिक/परस्पर अंतर राखण्याच्या अनुषंगाने परीक्षा उपकेंद्रावरील माहिती फलक, सांकेतिक चिन्हे,
भित्तिपत्रिका इत्यादी वरील सूचनांचे कटाक्षाने पालन करावे.
-परीक्षा संपल्यानंतर परीक्षा उपकेंद्राबाहेर जाताना शारिरीक/परस्पर अंतर राखणे उमेदवारांना अनिवार्य राहील
- वापरलेले टिश्यु पेपर, मुखपट, हातमोजे, सॅनिटाईझ पाऊच, इत्यादी वस्तू परीक्षा उपकेंद्रावरील आच्छादित
कुंडीमध्ये टाकावेत.