पंचवटी : महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत निर्देशित केलेल्या उपाययोजनेनुसार, पंचवटीत शनिवारपासून पंचवटी विभागातील घनकचरा व्यवस्थापन व मलेरिया विभागामार्फत मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.
पंचवटी विभागीय अधिकारी विवेक धांडे यांच्या आदेशानुसार, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांचे मार्गदर्शनाखाली विभागातील सहा प्रभागांत स्वच्छता निरीक्षकांच्या उपस्थितीत मान्सूनपूर्व विशेष स्वच्छता मोहिमेला प्रारंभ करण्यात आला.
सदर मोहिमेत विभागातील सर्व रस्ते, मनपा सार्वजनिक मैदान, उघड्या गटार, नदी व पावसाळी नाले, शाळा परिसर, धार्मिक क्षेत्र, बस स्थानक परिसर, राष्ट्रीय महापुरुषाचे स्मारक, समाज मंदिर परिसर, झोपडपट्टी परिसर, मनपा सार्वजनिक शौचालय स्वच्छता व जंतुनाशक फवारणी कचरा जमा करून तत्काळ घंटागाडीमार्फत उचलण्यात येत आहे.
मनपा मलेरिया विभागामार्फत पाण्याचे डबके तपासणी, घरोघरी जाऊन पावसाळ्यात होणाऱ्या आजाराबाबत माहिती देणे, नारळ करवंट्या टायर जमा करणे व जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे. सदर मोहीम दहा दिवस राबविण्यात येणार आहे.