मालेगाव : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत महावितरण कंपनीने केलेल्या विकासकामांचा अहवाल सादर करावा, तक्रारदारांसाठी हेल्पलाईन नंबर कार्यान्वित करण्याबरोबरच तक्रारदारांचे गाऱ्हाणे ऐकून घ्या, त्यांना सौजन्याची वागणूक द्या, त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करा. तसेच मान्सूनपूर्व देखभाल, दुरुस्तीच्या कामांची तत्काळ अंमलबजावणी करण्याची सूचना राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी केली.
वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा व वीज ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत भुसे बोलत होते. यावेळी भुसे यांनी सर्कल आणि डिव्हीजनच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. रस्त्यांच्या कामाला अडथळा ठरणारे रोहित्र स्थलांतरित करण्यात यावे, सबस्टेशनची प्रलंबित मागणी तातडीने मार्गी लावावी, नवीन रोहित्रांच्या मागणीसह सन २०११पासून प्रलंबित असलेले पेड पेंडींग निकाली काढावेत, महावितरणच्या अपघातात दगावलेल्या पशुधनाच्या नुकसानभरपाईची प्रकरणे निकाली काढावीत, मान्सूनपूर्व देखभाल, दुरुस्तीच्या कामांची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी तर ज्या रोहित्रावर अधिकचा भार आहे त्याठिकाणी प्राधान्याने क्षमता वाढवून देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. सर्कल कार्यालय ते संगमेश्वर दरम्यान एरियल बंच केबल टाकण्याचे काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
इन्फो
भूमिगत वाहिनीचे काम लवकरच
सर्कल ऑफिस ते संगमेश्वर एरियल बंच केबलचे काम येत्या २४ तासात कार्यान्वित करण्यात येईल. त्याचबरोबर १ जूनपर्यंत भूमिगत वाहिनीचेही काम पूर्ण होईल, असे आश्वासन नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी यावेळी दिले. तर महावितरणाच्या अपघातात बळी गेलेल्या पशुधनाची भरपाई व महावितरणच्या अपघातात मयत झालेले कर्मचारी सुभाष गायकवाड यांच्या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी महावितरणामार्फत सर्वतोपरी मदत देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली.