ज्या भागात शाश्वत पाऊस पडतो त्या भागात अनेक शेतकरी धूळ पेरणी करत असतात. साधारणत: तापी खोऱ्यातील रावेर, चोपडा आदी भागात धूळपेरणी केली जाते. नाशिक जिल्ह्यात मात्र धूळपेरणी कुणी करत नाही. पावसाचा अंदाज घेऊनच शेतकरी थेट पेरणी करीत असतात. सध्या मान्सून पूर्व पाऊस होत असल्याने मशागतीच्या कामांना वेग आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीचे नियोजन केले असले तरी कोरडवाहू क्षेत्रात मका, सोयाबीन, कापूस, बाजरी या पिकांना शेतकरी अधिक प्राधान्य देतात. यंदा बियाण्यांच्या आणि खतांच्या किमती वाढल्याने खरीप हंगामासाठी भांडवल उभारणीसाठी अनेक शेतकरी रब्बीतील पिकांची विक्री करीत आहेत. तर काहींनी मिळेल तेथून उचल घेण्याची तयारी केली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बँकांचे कामकाज अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू नसल्यामुळे खरीप कर्ज वाटपात अनेक अडचणी येत आहेत. कर्जवाटप केव्हा आणि किती होईल याचा अंदाज नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी स्वत:च्या परीने भांडवल उभारणीचा निर्णय घेतला आहे.
चौकट-
आदिवासी भागात भात, नागलीची रोपे टाकण्यापूर्वी राब भाजणी केली जाते. पहिला पाऊस पडल्यानंतर राब भाजणी केलेल्या जागेवर रोप टाकले जाते. साधारणत: १५ ते २० जून दरम्यान ही कामे सुरू होतात. सध्या पेठ, सुरगाणा, त्र्यंबक तालुक्यात राब भाजणीची कामे सुरू आहेत.