नाशिक : जिल्ह्यात सलग तीन दिवस झालेल्या मान्सूनपूर्व पावसात जिल्ह्यात ठिकठिकाणी पाच जनावरांचा मृत्यू झाला, तर १२ घरांचे छत उडून गेल्याने नुकसान झाले आहे. त्र्यंबकेश्वर,पेठ, सुरगाणा, दिंडोरी व सिन्नर या तालुक्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसामुळे या तालुक्यांमध्ये अनेक घरांचे तसेच जनावरांच्या गोठ्याचे किरकोळ नुकसानदेखील झाले आहे. जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार बरसात झाल्याने अनेक तालुक्यांना चांगलाच फटका बसला. शेतकऱ्यांच्या पोल्ट्री तसेच शेडनेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर गोठे तसेच घरांचे पत्रेदेखील उडाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. विजांचा कडकडाट तसेच जोरदार वादळीवाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने काही ठिकाणी वृक्षदेखील उन्मळून पडली. या पावसामुळे पाच दुभती जनावरे दगावली, तर त्र्यंबकेश्वरमध्ये पाच, सुरगाणा येथे तीन, सिन्नर तालुक्यात दोन, तर कळवण आणि दिंडोेरी येते प्रत्येकी एक याप्रमाणे घरांची पत्रे उडाली. दरम्यान, त्र्यंबकेश्वरमध्ये एकजण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात असून नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सकाळच्या सत्रात ऊन आणि दुपारनंतर जोरदार बरसलेल्या पावसाने जिल्ह्याला सलग तीन दिवस झोडपून काढले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील या पावसाचा मोठा फटका बसला. अनलॉकमुळे व्यवहार पूर्वपदावर येत असतानाच पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले तसेच दळणवळणावरही परिणाम झाल्याचे दिसून आले. जाेरदार वाऱ्यामुळे काही घरांच्या छताचा भाग उडून गेला तर भिंतींचीही काही ठिकाणी पडझड झाली. यारोबरच पोल्ट्री फार्मला चांगलाच फटका बसला. दिंडोरी, सिन्नर येथील पोल्ट्रींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
त्र्यंबकेश्वर,पेठ, सुरगाणा, दिंडोरी व सिन्नर या तालुक्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने या तालुक्याांना फटका बसला. अगोदरच तौक्ते चक्रीवादळामुळे शेतकरी सावरत असतानाच मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसानीत भर पडली आहे. शहरालादेखील पावसाने झोडपून काढले मात्र ग्रामीण भागात या पावसामुळे नुकसान झाल्याची माहिती समेार आली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले. मुसळधार पावसाने अेाढ्यांना पूर आला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे डोळओहळ या ठिकाणी भगवान घाटाळ हे पुरात वाहून गेले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचा पंचनामा करून शासनाला अहवाल पाठवला आहे.