नाशिक : मान्सूनच्या जलधारांचा वर्षाव सर्वदूर होऊ लागला आहे. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढणार असून वसुंधरेला जणू हिरवा शालूचा साज चढलेला पहावयास मिळणार आहे. पावसाळी वातावरणाची मोहिनी न पडल्यास नवलच ! वर्षा सहलीचा आनंद लुटताना नेमकी काय खबरदारी घ्यावी्य कोणत्या पर्यटनस्थळांना भेटी द्याव्यात? याबाबत राज्य पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे यांच्याशी साधलेला संवाद ...
- वर्षा सहलीचा अनुभव लुटण्यासाठी नेमक्या कोणत्या परिसराची निवड करता येईल ?
- पावसाळा म्हटला की, सर्वदूर निसर्गाचे वेगळेच मनमोहक रूपडे पहावयास मिळते. सर्वत्र हिरवळ, सरींचा वर्षाव, हिरवाईने नटलेल्या डोंगररांगावरून कोसळणाऱ्या पांढ-या शुभ्र जलधारा असे वातावरण नाशिक जिल्ह्यात नक्कीच अनुभवता येणार आहे. यासाठी ‘वीकेण्ड ट्रीप’चा बेत आखण्यास हरकत नसावी. गंगापूर धरणापासून तर त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी या तालुक्यांमध्ये भटकंतीला प्राधान्य द्यावे. भावली, अंजनेरी, पेगलवाडी-पहिने, वैतरणा, घाटनदेवी, भंडारदरा, कसारा जव्हार, मोखाडा या भागांना भेटी देता येतील.
- पावसाळी पर्यटन करताना काय खबरदारी घ्यावी?
- पावसाळी हंगामातील पर्यटन करताना खबरदारी नक्कीच घ्यायला हवी. यामध्ये प्रामुख्याने घरातून निघण्यापुर्वी आपल्या वाहनांची आवश्यक ती तपासणी गरजेची आहे. ‘वाहन व्यवस्थीत तर जीवन सुरक्षित’ याचा विसर पडू देऊ नये. तसेच पर्यटनस्थळांवर पोहचल्यानंतर विशेषत: धबधबे, घाटमार्ग, धरण परिसरात बेभानपणे वर्तन अजिबात अपेक्षित नाही. प्रत्येकाने स्वयंशिस्त बाळगावी. आपल्यामुळे कोणाच्या आनंदावर पाणी फिरणार नाही, याची काळजी घ्यावी. अतिउत्साहीपणा प्रत्येकाने टाळायला हवा. सुचनाफलकांच्या संदेशाकडे दुर्लक्ष अजिबात करू नये. पर्यटनस्थळांवर स्वच्छता राखावी, मद्यप्राशनासाठी पावसाळी पर्यटनाचा बेत आखणे धोक्याचे ठरेल.
- आपत्कालीन परिस्थितीत मदतीचा हात कसाद्यावा?
- पावसाळी पर्यटनाला बाहेर पडताना सोबत पॉवरबॅँक ठेवावी जेणेकरून मोबाईल बंद पडणार नाही. पर्यटन करताना कोठे काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आपल्यासारख्याच त्या पर्यटकांनाही मदतीचा हात द्यावा. मोबाईल नेटवर्क मिळत नसले तरी आपत्कालीन १००, १०१, १०८ हे क्रमांक डायल होतात. त्यावरून निश्चित स्वरूपाची मदत मिळवावी. नेटवर्क असल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. अपघातांच्या घटनांकडे दुर्लक्ष करू नये.
- धबधब्यांचे सोेंदर्य कसे न्याहाळावे?
पावसाळ्यात धबधबे ओसंडून वाहतात. जिल्ह्यांत धबधब्यांची संख्या अधिक आहे. धबधब्यांचे रूपडे लांब अंतरावरून डोळ्यांत साठवावे. धबधब्यांजवळ जाणे कटाक्षाने टाळावे. जेणेकरून दुर्घटना घडणार नाही.
शब्दांकन : अझहर शेख.