नाशिक : माध्यमिक शालांत म्हणजेच इयत्ता दहावीची परीक्षा देणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची शाळा स्तरावरून ‘कलचाचणी’ करणे बंधनकारक असल्याने शाळांनी येत्या १५ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत विद्यार्थ्यांची कलचाचणी घेऊन याबाबतचा अहवाल विभागीय मंडळाकडे जमा करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. शैक्षणिक आयुष्यात दहावीला विशेष महत्त्व असल्याने दहावीतच विद्यार्थ्यांचा पुढील शैक्षणिक कल लक्षात घेण्यासाठी शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांची कलचाचणी घेतली जाते. यावर्षी दहावीत प्रविष्ट असलेल्या नियमित विद्यार्थ्यांची कलचाचणी १५ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत होणार आहे. फेब्रुवारी, मार्च २०१७ मध्ये प्रथम प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर कलचाचणी बंधनकारक आहे. सदर चाचणी ही शाळास्तरावरच होणार असल्याने संबंधित शाळांनी आपल्या शाळेमधील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेतील संपूर्ण संगणक यंत्रणा तयार करावी, असे परीक्षा मंडळाने कळविले आहे. शाळेमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि उपलब्ध संगणक यांचे वेळापत्रक तयार करून विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात यावी, यासाठी एका शिक्षकाची नेमणूक करून त्याबाबतची माहिती मंडळास कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नियमित विद्यार्थ्यास सदर कलचाचणी अनिवार्य असल्याने कलचाचणीस उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती पत्रकात स्वाक्षरी घेणे अनिवार्य आहे. सदर सर्व उपस्थिती पत्रके प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षांच्या गुणपत्रकाबरोबर विभागीय मंडळात जमा करणे बंधनकारक आहे.
कलचाचणी बंधनकारक
By admin | Published: February 04, 2017 10:51 PM