ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 11- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध प्रभागांमधे उमेदवारांकडून प्रचारासाठी मोठ मोठे फ्लेक्स लावण्यात येत असून फ्लेक्स प्रीटिंग व्यवसायिकांकडे पक्षाच्या तसेच अपक्ष उमेदवारांनी लहान मोठ्या आकाराचे फ्लेक्स तयार करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
त्यामुळे प्रीटिंग व्यवसायिकांचा व्यवसाय तेजीत आला असून नेहमीच्या तुलनेत प्रीटिंग व्यवसायात निवडणुकीच्या कालावधीत 55 ते 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. निवडणूक तोंडावर आली की, राजकीय नेतेमंडळी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी फ्लेक्सचा वापर करतात. निवडणुका जाहीर करण्यापूर्वी अनेक इच्छुकांनी वाढदिवस, सण, उत्सव, नवीन वर्ष यानिमित्ताने शहरातील विविध ठिकाणी फ्लेक्स लावून ब्रॅडिंग करण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे फ्रेक्सची छपाई करणा-या व्यावसायिकांचा व्यापारात वाढ झाली होती. पण तत्कालीन स्थितीत ठराविक अंतरांने फ्लेक्सची मागणी होत होती. त्या तुलनेत निवडणुका जाहीर झाल्यानंतर फ्लेक्सला मागणी वाढली आहे.