सुनिल बोडके, वेळुंजे : मेक इन इंडिया, डिजिटल इंडियाचे स्वप्न दाखविणाऱ्या देशातील ग्रामीण भारताचे वास्तव अजूनही मन विषण्ण करणारे आणि विदारक आहे. खेडोपाड्यांवर रस्त्यांचे जाळे आणि घरोघरी वीज नेऊन पोहोचविण्याचा दावा करणा-या सरकारी यंत्रणेत दडलेली असंवेदनशीलता अनेक उदाहरणांतून यापूर्वी समोर आलेली आहे. त्याच दुर्लक्षित भारतातील दुर्गम आदिवासी भागातील एका गर्भवती महिलेला केवळ रस्ता नाही म्हणून डोली करुन प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले गेल्याची हृदयद्रावक घटना सरकारी यंत्रणेला नजरेआड करता येणार नाही.त्र्यंबकेश्वर पासून अवघ्या १४ कि. मी. अंतरावर असलेल्या किल्ले हर्षेगड अर्थात हरिहरच्या पायथ्याशी वसलेले एक ५०० लोक वस्तीची छोटीशी हर्षवाडी. शिवरायांच्या गडकोटांपैकी एक हरिहर किल्ला प्रसिद्ध आहे. वर्षभरात लाखो पर्यटक या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात. त्यामुळे हा परिसर पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु, हीच हर्षवाडी विकासापासून कायमच वंचित राहिली आहे. त्याची प्रचिती नुकतीच आली. हर्षवाडी येथील संगीता मंगेश दोरे(२६) या महिलेला शनिवारी (दि.२९) मध्यरात्रीपासून प्रसूती वेदना सुरु होत्या. दवाखान्यात घेऊन जायचे परंतु गाडी आणण्यासाठी गावात रस्ताच नाही. जो आहे त्याची अत्यंत दुरवस्था झालेली. त्यामुळे महिलेला प्रसुति यातना भोगत तेथेच दोन तास अडकून पडावे लागले. दुसºयादिवशी अंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका बोलाविण्यात आली परंतु गाडी जाण्यासाठी रस्ता अतिशय खराब असल्याने गाडी अर्ध्या रस्त्यातच ठेवून दीपक मिंदे व गावातील काही तरु णांनी त्या महिलेला अखेर डोली करुन गाडीपर्यंत आणले आणि नंतर अंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. सध्या या महिलेची व बाळाची प्रकृती स्थिर आहे.
डोली करुन गर्भवतीची दवाखान्यात भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 4:35 PM
रस्ताच नसल्याने नातेवाईकांची पायपीट : ग्रामीण भागातील विदारक वास्तव
ठळक मुद्देहर्षवाडी विकासापासून कायमच वंचित राहिली आहे